नवी दिल्ली: कर्नाटकच्या जनतेनं काँग्रेसच्या विरोधात कौल दिला. त्यांचे निम्म्याहून अधिक मंत्री पराभूत झाले. याच पराभवाचं काँग्रेसकडून सध्या सेलिब्रेशन सुरू आहे, असा टोला भाजपाचे अध्यक्ष अमित शहांनी काँग्रेसला हाणला आहे. कर्नाटकमधील भाजपाचं सरकार अवघ्या 55 तासांमध्ये कोसळल्यानंतर शहा यांनी प्रथमच पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आणीबाणीवरुन काँग्रेसवर शरसंधान साधलं. आणीबाणी लागू करणाऱ्यांनी लोकशाहीच्या बाता मारु नयेत, अशा तिखट शब्दांमध्ये शहा यांनी काँग्रेसवर टीका केली.
कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपाला सर्वाधिक 104 जागा मिळाल्या. शनिवारी विधानसभेत बहुमत सिद्ध करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयानं भाजपाला दिले होते. मात्र बहुमतासाठी आवश्यक आमदारांचा पाठिंबा नसल्यानं येडियुरप्पा यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. आता कर्नाटकमध्ये राज्यपालांनी काँग्रेस आणि जेडीएसला सत्ता स्थापनेचं निमंत्रण दिलंय. काँग्रेस आणि जेडीएसच्या या निवडणुकीनंतरच्या युतीवर अमित शहांनी जोरदार टीका केली. काँग्रेस आणि जेडीएसची युती जनमताविरुद्ध असल्याचं शहा म्हणाले.
ईव्हीएम आणि निवडणूक आयोगाचा उल्लेख करुनही शहांनी काँग्रेसला टोला लगावला. 'आता काँग्रेसला ईव्हीएम आणि निवडणूक आयोगाबद्दल विश्वास वाटू लागला आहे. अर्धवट विजय मिळूनही काँग्रेसला ईव्हीएम आणि निवडणूक आयोग आवडू लागला आहे, हे खूप चांगलं आहे,' असा चिमटा शहांनी काढला. विरोधकांच्या एकतेवरही त्यांनी यावेळी भाष्य केलं. अखिलेश यादव, ममता बॅनर्जी 2014 मध्येही आमच्या विरोधात होते. 2019 मध्ये असतील. 2019 मध्ये आम्ही 2014 पेक्षा मोठा विजय मिळवू, असं शहा यांनी म्हटलं.