- केशव उपाध्येअंधेरा छटेगा, सूरज निकलेगा, कमल खिलेगा, असे ३८ वर्षांपूर्वी याच वांद्र्यातील भूमीत उभे राहून अटलजींनी विधान केले होते. जनता पक्षातून जुन्या जनसंघाच्या लोकांना बाहेर पडण्याची स्थिती तयार करण्यात आली होती. त्यानंतर वांद्र्यातच झालेल्या अधिवेशनात अटलजींनी घोषणा केली होती. आज मागे वळून पाहताना ही घोषणा शब्दश: खरी ठरल्याचे दिसते.खरं तर ३८ वर्षांचा कालखंड हा राजकीय पक्षासाठी फार मोठा कालखंड नाही. पण ज्या पार्श्वभूमीवर भाजपाची स्थापना झाली त्या पार्श्वभूमीवर भाजपाचे हे विराट यश महत्त्वाचे आहे. देशात भाजपा आणि डावे पक्ष वगळता इतर बहुतांशी पक्षांची घराणेशाहीच्या विळख्यात सापडलेले कौटुंबिक पक्ष अशीच अवस्था आहे. वैचारिक भूमिकेपेक्षा कौटुंबिक धोरणांचे परिणाम या पक्षांच्या निर्णय प्रक्रियेला असतात. जगभरात डावे पक्ष विश्वासार्हता गमावत असताना भारतातही त्याचीच री ओढली जात आहे. या पार्श्वभूमीवर भाजपाचे यश विशेष महत्त्वाचे आहे.१९८० साली स्थापन झाल्यानंतर पक्षाचा महाराष्ट्राचा प्रवास हा सहजसोपा नव्हता. स्वातंत्रलढ्याची पार्श्वभूमी आणि त्यानंतर सहकाराच्या माध्यमातून काँग्रेस पक्षाने पाया मजबूत केला होता. त्याशिवाय समाजवादी, डावे हे सुद्धा महाराष्ट्रात आपले गड राखून होते. विचार जरी वेगळे असले आणि एकमेकांना विरोध करीत असली तरी ही मंडळी भाजपाच्या विरोधात मात्र एकत्र येऊन भाजपाला स्थान मिळूच द्यायचं नाही, यावर मात्र एक होती. आणि सातत्याने भाजपाचा विस्तार होऊ नये यासाठी प्रयत्न करीत होती. भाजपाकडे साधने नव्हती, अडचणीचे डोंगर होते. पराकोटीची आव्हाने होती पण त्याचबरोबर भाजपाकडे व्यक्तिगत आकांक्षा नसलेल्या तरुणांचा एक जथ्था होता. भारावलेल्या वातावरणात विचारांसाठी काम करणारा आणि पक्ष वाढला की आपणही पुढे जाऊच या भूमिकेत वावरणाऱ्या कार्यकर्त्यांची फौज त्याकाळी मोठी होती. प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे, प्रकाश जावडेकर, नितीन गडकरी, धरमचंद चोरडिया, विदर्भात लक्ष्मणराव मानकर, पांडुरंग फुंडकर असे किती तरी तरुण त्याकाळी काम करीत होते. डोळ्यांसमोर फक्त आणि फक्त राष्ट्रहित सर्वतोपरी ही भावना आणि त्यासाठी आवश्यक असल्याने आपल्या विचारांचं राष्ट्र घडवण्यासाठी, आपला पक्षाला बलशाली बनवण्याची इच्छा होती. त्यासाठी खडतर प्रयत्नांची पराकाष्ठा करण्याची तयारी होती.वर्षानुवर्षे सत्ता असल्यामुळे अमरत्वाचा पट्टा मिळाल्याच्या आविर्भावात हळूहळू काँग्रेस नेतृत्व आणि इतर नेतेमंडळी सर्वसामान्यांना गृहीत धरून राजकारण करीत होती. समाजाला भेडसावणाऱ्या समस्या वाढतच चाललेल्या असताना त्या सोडवण्याऐवजी सर्रास दुर्लक्ष केलं जायचं. उलट त्या तशाच ठेवून सोडवण्याच्या भूलथापांचं फक्त राजकारण केलं जायचं. आणि एकीकडे काम करत नसतानाच दुसरीकडे मात्र कमालीचा भ्रष्टाचारही त्या काळातील राजकारण्यांची महत्त्वाची लक्षणं बनली होती. मात्र याच मुद्द्यांवर कोणी भूमिका घेत नव्हते. भ्रष्टाचार आणि समाजातील विविध प्रश्न हाताळत भाजपाने आपल्या प्रवासाला सुरुवात केली. भाजपाचे नेते सर्वसामान्यांबरोबरच शेतकऱ्यांचे, तरुणांचे, समाजातील विविध घटकांचे प्रश्न हातात घेऊन लढत होते. आज शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर अनेकांना जाग आली. परंतु शेतकऱ्यांच्या प्रश्नावर पहिले आंदोलन १९८० च्या दशकात गोपीनाथ मुंडे यांनी केले होते. शेतकऱ्यांचा विराट मोर्चा त्यांनी काढला होता. तर त्याच कालखंडात प्रकाश जावडेकरांनी काढलेला बेरोजगार मोर्चा खूपच गाजला होता. विदर्भाच्या अनुशेषाच्या मुद्द्यांवर नितीन गडकरी रस्त्यावर उतरले होते. कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या व्यथा भाऊसाहेब फुंडकरांनी मांडल्या होत्या. मराठवाडा विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्याच्या निर्णयाला भाजपाने समर्थन दिले. त्याचबरोबर दलित आदिवासी यांच्या प्रश्नांवर लढे उभे केले. या सगळ्या संघर्षातून भाजपा लोकांमध्ये विश्वास निर्माण करीत होता. सर्वसमावेशक आणि सर्वसामान्यांचा पक्ष म्हणजे भाजपा असा विश्वास तयार झाला तो यातूनच.समाजातील विविध आंदोलने आणि प्रश्न हाताळत भाजपाचे नेतृत्व सर्वमान्य होत होतेच. पक्ष विस्तारत होता पण या नेतृत्वाने संस्कार करीत नवी पिढीसुद्धा घडवली. भाजपाच्या महाराष्ट्रातील विद्यमान मंत्रिमंडळातील सर्व प्रमुख नेते याच संघर्षाच्या प्रक्रियेतून गेले आहेत. विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लावून धरलेला सिंचन घोटाळा, एकनाथ खडसे यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सरकारच्या विरोधात विधानसभेत केलेला संघर्ष यातून भाजपा सर्वसामान्यांचा पक्ष म्हणून सर्वमान्य होत गेला. भाजपाचा पाया विस्तारत गेला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची विश्वासार्हता आणि महाराष्ट्रात भाजपाच्या कार्यकर्त्यांनी वर्षानुवर्षे केलेली मेहनत या पाठबळावर भाजपाला २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळाले. भाजपा सत्तेवर आली. आज गेल्या साडेतीन वर्षांत भाजपाने आपल्या कारभारातून अनेक लोकोपयोगी निर्णय घेतले. देशांतील आतापर्यंतची सर्वात मोठी शेतकऱ्यांसाठीची कर्जमाफी करत लाखो शेतकऱ्यांचा सातबारा कोरा केला. तर जलयुक्त शिवारसारखी वेगळी संकल्पना राबवित आज अनेक गावातील दुष्काळाचा प्रश्न सोडविला. तर नुकत्याच आलेल्या अहवालानुसार पायाभूत सोयी-सुविधांमध्ये महाराष्ट्राने खूप प्रगती केली आहे.मूल्याधिष्ठित राजकारण हे व्रत आणि सत्ता हे ध्येय नाही, तर साधन आहे, ही भाजपाची भूमिका होती आणि ही भूमिका कायम राहणार आहेच. त्या आधारवरच पक्ष वाढला. आज अनेक पक्ष राजकीय यशापयशात कमी-जास्त होत असताना भाजपा मात्र सातत्याने वाढतोय आणि वाढत राहिला.भाजपाच्या अनेक पिढ्यांनी केलेल्या त्यागातून आणि परिश्रमातून पक्षाचे संचित उभे राहिले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भक्कम आणि लोकप्रिय नेतृत्व लाभताच भाजपाने नवी झेप घेतली. भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्या संघटन कौशल्यामुळे पक्षाची भक्कम बांधणी झाली आहे. अशा स्थितीत गेल्या साडेतीन वर्षांत भाजपाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब पाटील दानवे यांच्या नेतृत्वात भाजपाने महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये जबरदस्त कामगिरी केली. या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भाजपा राज्यात पहिल्या नंबरवर आला आहे. भाजपाची पाळेमुळे बळकट झाली आहेत आणि आता पक्ष आणखी नवी झेप घेण्यास सज्ज झाला आहे. मुंबई विराट महामेळाव्यासाठी जमणारी लाखो कार्यकर्त्यांची उत्साह त्याचेच निदर्शक आहे.(लेखक भाजपा, महाराष्ट्रचे प्रवक्ते व प्रदेश माध्यम विभागप्रमुख आहेत.)
कार्यकर्त्यांच्या त्यागातून घडला विराट भाजपा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 05, 2018 8:18 PM