भाजपा काहीही म्हणो, मी शिवभक्त आणि खरेपणावर माझा विश्वास - राहुल गांधी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2017 08:30 PM2017-11-13T20:30:53+5:302017-11-13T20:33:30+5:30
गुजरात दौऱ्यावर असताना काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी मंदिरांना भेट दिली होती त्यावरुन त्यांना भाजपानं लक्ष्य केलं होत.
अहमदाबाद - मी शिवभक्त आहे आणि भाजपा काहीही म्हणो त्यानं मला फरक पडत नाही. माझा माझ्या खरेपणावर विश्वास आहे. असे म्हणत काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी भाजपाला प्रत्युत्तर दिलं आहे. गुजरात दौऱ्यावर असताना काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी मंदिरांना भेट दिली होती त्यावरुन त्यांना भाजपानं लक्ष्य केलं होत. गुजरातमध्ये विधानसभा निवडणुका ९ डिसेंबर आणि १४ डिसेंबर अशा दोन टप्प्यांत होणार आहेत.
राहुल आज पाटन येथे पोहोचले. तत्पूर्वी मेहसाणा येथील बहुचरा जी मंदिरात राहुल यांनी पूजा केली. पाटन येथे मीडियाने विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना राहुल यांनी भाजपावर घणाघाती टीका केली.
भाजपचे राष्ट्रीय प्रवक्त भूपेंद्र यादव यांनी एका पत्रकार परिषदेत म्हटले होते की काँग्रेसचे स्टार प्रचारक राहुल गांधी मंदिरांमध्ये जाऊन पूजा करत आहेत. हा संस्कृतीचा भाग आहे आणि चांगलं आहे. पण ही प्रवृत्ती आपोआप येते, केवळ निवडणुकांपुरती नाही. राहुल यांना सौराष्ट्रच्या प्रसिद्ध द्वारकाधीश मंदिरात दर्शन घेऊन आपल्या नवसृजन यात्रेला सुरुवात केली होती. एक हजार पायऱ्या चढून त्यांनी डोंगरावरच्या चामुंडा मातेचे दर्शनही घेतले होते.
राहुल गांधी शनिवारी सकाळी अक्षरधाम मंदिरात गेले. त्यांनी मंदिरात भगवान स्वामीनारायण यांची पूजा केली आणि आपल्या तीन दिवसीय दौ-याचा प्रारंभ केला. या दौ-यात ते सहा जिल्ह्यांत जाणार आहेत. शनिवारी त्यांनी उत्तर गुजरात भागात रोड शो केला आणि काही सभाही घेतल्या. काँग्रेस व जनतेच्या दबावामुळेच मोदी सरकारला जीएसटी कर कमी करावा लागला, असा दावा त्यांनी सभांत केला. काँग्रेस सत्तेवर आल्यानंतर देशभर एक वस्तू एक कर पद्धत लागू केली जाईल, सध्या पाच करांचा जो प्रकार आहे, त्यामुळे जनता भरडली जात आहे, असेही ते म्हणाले.