नवी दिल्ली- भाजपा खासदार आणि अभिनेता शत्रुघ्न सिन्हा यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्यावर निशाणा साधला आहे. शत्रुघ्न सिन्हा बोलले आहेत की, भाजपा तेव्हाच लोकांच्या अपेक्षांवर उतरु शकते जेव्हा ते 'वन मॅन शो' आणि 'टू मॅन आर्मी'च्या चक्रव्यूहातून बाहेर पडेल. त्यांनी सांगितलं की, 'देशातील तरुण, शेतकरी आणि व्यापारी भाजपा सरकारच्या धोरणांमुळे नाराज आहे'.
शत्रुघ्न सिन्हा यांनी पीटीआयशी बोलताना सांगितलं की, 'मला वाटतं आम्हाला गुजरात आणि हिमाचल प्रदेश या दोन्ही विधानसभा निवडणुकीत कडव्या आव्हानांचा सामना करत आहोत. कारण तरुण, शेतकरी आणि व्यापा-यांमध्ये केंद्र सरकारच्या धोरणांवरुन नाराजी आहे'.
शत्रुघ्न सिन्हा हे पाटलीपुत्रमधून लोकसभा खासदार आहेत. गेल्या काही महिन्यांपासून आपल्या वक्तव्यांमुळे ते नेहमी चर्चेत राहत आहेत. काही दिवसांपुर्वी त्यांनी माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा यांचं समर्थन करताना, देशाच्या ढासळत्या अर्थव्यवस्थेवरुन केंद्र सरकारवर निशाणा साधला होता. जेव्हा त्यांना भाजपा पक्ष सोडण्याचा विचार करत आहात का ? असं विचारण्यात आलं तेव्हा त्यांनी सांगितलं की, 'मी सोडण्यासाठी भाजपा पक्षात सामील झालो नव्हतो. पण जेव्हा कधी मी बोलतो की आम्ही आव्हानांचा सामना करुन शकत नाही, तेव्हा मी याकडे दुर्लक्ष करु शकत नाही की, पक्ष 'वन मॅन शो' आणि 'टू मॅन आर्मी होत चालला आहे'.
ज्या वरिष्ठ नेत्यांनी पक्षासाठी इतकं काम केलं, अनेक गोष्टींचा त्याग देऊन पक्ष उभा केला त्यांचा आशिर्वाद घेऊन निर्धाराने लढाई लढली पाहिजे असं शत्रुघ्न सिन्हा बोलले आहेत. 'मला आजपर्यंत हे समजलेलं नाही की, लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, यशवंत सिन्हा आणि अरुण शौरी यांच्यासारख्या वरिष्ठ नेत्यांची काय चूक आहे जे त्यांना साइडलाइन केलं जात आहे. त्यांना अर्ध्यावर का सोडण्यात आलं आहे. आपण सर्व कुटुंबाचे सदस्य आहोत. जर यांच्यापैकी कोणीही चुकलं असेल, तर ती चूक विसरली जाऊ शकत नाही का ?' असा प्रश्न शत्रुघ्न सिन्हा यांनी यावेळी विचारला.