नवी दिल्ली - बांगलादेशातहिंदूंच्या 66 घरांची नासधूस करण्यात आली आणि जवळपास 20 घरे जाळण्यात आली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, गेल्या आठवड्यात दुर्गा पूजेदरम्यान मंदिर तोडफोडीच्या घटनांनंतर कथित निंदनीय मीडिया पोस्टवरून बांगलादेशात पुन्हा एकदा हिंसाचार उफाळला. बीडीन्यूज24 डॉट कॉमच्या अहवालानुसार हा हल्ला रविवारी रात्री उशिरा राजधानी ढाकापासून 255 किमी अंतरावर असलेल्या गावात झाला. याच दरम्यान भाजपा नेते सुब्रमण्यम स्वामी (BJP Subramanian Swamy) यांनी मोदी सरकारवरच (Modi Government) हल्लाबोल केला आहे. बांगलादेशमध्ये (Bangladesh) झालेल्या हिंसाचारावरून त्यांनी केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे.
सुब्रमण्यम स्वामी यांनी बांगलादेशमधील परिस्थितीवरून प्रश्न उपस्थित केला आहे. तसेच बांगलादेशमधील हिंदूंविरोधातील हिंसाचाराच्या वाढत्या घटनांचा भाजपा सरकार निषेध का करत नाही? असं म्हटलं आहे. यासोबतच आपण मालदीवला देखील घाबरणार आहोत का? असं म्हणत टीकास्त्र सोडलं आहे. सुब्रमण्यम स्वामी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. "बांगलादेशमधील हिंदूंविरोधातील हिंसाचाराच्या वाढत्या घटनांचा भाजपा सरकार निषेध का करत नाही? आपण बांगलादेशला घाबरतो का? असा सवाल उपस्थित करत टोला लगावला आहे.
"आपण मालदीवला देखील घाबरणार आहोत का?"
"लडाखमधील चीनी अतिक्रमणाच्या भीतीनंतर आपण तालिबानने अफगाणिस्तान ताब्यात घेण्याच्या मुद्द्यावर देखील माघार घेतली आणि त्यांच्याशी चर्चेची तयारी दाखवली. आता पुढे आपण मालदीवला देखील घाबरणार आहोत का?" असं देखील सुब्रमण्यम स्वामींनी म्हटलं आहे. बांगलादेशच्या चटगांव विभागातील कुमिला येथील दुर्गा पूजेच्या ठिकाणी निंदा केल्याच्या कथित घटनेनंतर जातीय तणाव वाढला आहे, ज्यामुळे हिंदू मंदिरे आणि कमिल्ला, चांदपूर, चॅटोग्राम, कॉक्स बाजार, बंदरबन, येथील मंदिरांवर हल्ले झाले. मौलवी बाजार, गाझीपूर, चापैनवाबगंज, फेनी आणि इतर जिल्ह्यांमध्ये तोडफोड आणि पोलिसांशी चकमक झाली. सोशल मीडियावर हल्ला आणि जातीय द्वेष पसरवणाच्या आरोपाखाली काही लोकांना अटक करण्यात आली आहे, असे अहवालात म्हटले आहे.