वन नेशन वन इलेक्शनवरुन भाजपाचा यू-टर्न
By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2018 04:59 PM2018-08-14T16:59:58+5:302018-08-14T17:00:37+5:30
लोकसभा आणि विधानसभा निवडणूक एकत्रित घेण्याचा विचार नसल्याचं स्पष्टीकरण
नवी दिल्ली: वन नेशन वन इलेक्शनसाठी विधी आयोगाला पत्र लिहिणाऱ्या भाजपानं आता यू-टर्न घेतला आहे. एकाचवेळी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका घेण्याचा आमचा विचार नाही, असं भाजपाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. आम्ही एक देश आणि एक निवडणुकीची मागणीच केलेली नाही, असं म्हणत भाजपानं यावरुन सुरू असलेल्या चर्चांचं खंडन केलं आहे.
विशेष म्हणजे खुद्द भाजपा अध्यक्ष अमित शहा यांनी 'वन नेशन वन इलेक्शन'च्या मुद्दावरुन विधी आयोगाला पत्र लिहिलं होतं. लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकाचवेळी घेतल्यास पैशांची बचत होईल. याशिवाय प्रशासनावरील ताणदेखील कमी होईल, असं शहांनी पत्रात म्हटलं होतं. पुढच्या वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसोबत ११ राज्यांच्या विधानसभा निवडणुकाही घेतल्या जाऊ शकतात आणि त्यात महाराष्ट्राचाही समावेश असेल, असं वृत्त काल चर्चेत होतं.
भाजपाकडून अनेकदा 'वन नेशन वन इलेक्शन'ची भूमिका मांडण्यात आली आहे. त्यामुळे लोकसभेसह 11 राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होऊ शकतात, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. अमित शहांनी विधी आयोगाला पत्र लिहिल्यानंतर ही चर्चा सुरू झाली होती. त्यामुळे आज भाजपानं स्पष्टीकरण दिलं. 'लोकसभा आणि विधानसभा निवडणूक एकाचवेळी घेण्याचा आमचा विचार नाही. आम्ही तशी मागणीदेखील केलेली नाही,' अशा शब्दांमध्ये भाजपानं वन नेशन वन इलेक्शनवर सुरू असलेल्या चर्चेचं खंडन केलं आहे. एकाचवेळी लोकसभा आणि विधानसभा निवडणूक होणं शक्य नसल्याचं आज सकाळीच निवडणूक आयोगानं स्पष्ट केलं. त्यानंतर आता भाजपानं याबद्दल स्पष्टीकरण देत लोकसभा आणि विधानसभा निवडणूक एकत्र घेण्याचा विचार नसल्याचं म्हणत या चर्चेला पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला आहे.