उत्तर प्रदेशात भाजप महिला मतदारांवर लक्ष केंद्रित करणार, नवीन वर्षात नऊ मोहिमा राबविणार - जे. पी. नड्डा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 1, 2024 08:00 AM2024-01-01T08:00:20+5:302024-01-01T08:00:41+5:30
यावेळी नड्डा यांनी आवाहन केले की, त्यांनी महिला मतदारांवर लक्ष केंद्रित करावे. राज्यातील प्रत्येक जिल्हा, तालुका आणि गावपातळीवर महिला मतदारांना केंद्रस्थानी ठेवून समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचण्यासाठी स्वतंत्र मोहीम राबवावी.
राजेंद्र कुमार -
लखनौ : उत्तर प्रदेशात भाजप महिला मतदारांवर लक्ष केंद्रित करणार असल्याचे भाजपचे अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी रविवारी येथे सांगितले. नड्डा यांनी लखनौत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि पक्षाच्या नेत्यांसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मन की बात कार्यक्रम पाहिला. त्यानंतर शहरातील एका कार्यक्रमात त्यांनी उपस्थितांना संबोधित केले.
यावेळी नड्डा यांनी आवाहन केले की, त्यांनी महिला मतदारांवर लक्ष केंद्रित करावे. राज्यातील प्रत्येक जिल्हा, तालुका आणि गावपातळीवर महिला मतदारांना केंद्रस्थानी ठेवून समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचण्यासाठी स्वतंत्र मोहीम राबवावी. जेणेकरून राज्यातील ७५ जागा जिंकण्याचे लक्ष्य गाठता येईल.
नड्डा यांनी नेत्यांना सांगितले की, ज्याप्रमाणे मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये महिलांनी विश्वास व्यक्त करून भाजपला मतदान केले. त्याचप्रमाणे आता उत्तर प्रदेशात महिला मतदारांचे आशीर्वाद मिळविण्यासाठी पक्षाला प्रयत्न करायचे आहेत. महिलांपर्यंत पोहोचण्यासाठीच्या नऊ योजनांचाही त्यांनी उल्लेख केला.
वसतिगृहात राहणाऱ्या मुली, महिला खेळाडू, ट्रान्सजेंडर समुदायाशीही संपर्क साधला जाईल. पक्षाची महिला मोर्चाची आघाडी शाळा, महाविद्यालये आणि विद्यापीठांना भेटी देईल, विद्यार्थिनींना नारीशक्ती वंदन कायद्याचे फायदे समजावून सांगण्यासोबतच नवीन नेतृत्व निर्माण करण्याचे काम करेल.