महाराष्ट्र, उत्तर प्रदेशात प्रत्येक घरी पाचवेळा भेट देणार भाजप
By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2019 04:32 AM2019-01-27T04:32:16+5:302019-01-27T04:32:39+5:30
लोकसभा निवडणुकीचा श्रीगणेशा करताना भारतीय जनता पक्षाने सर्वच बूथ प्रमुखांच्या बैठका सुरू करण्यावर भर दिला आहे.
- संतोष ठाकूर
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीचा श्रीगणेशा करताना भारतीय जनता पक्षाने सर्वच बूथ प्रमुखांच्या बैठका सुरू करण्यावर भर दिला आहे. पक्षाध्यक्ष अमित शाह हे स्वत: उत्तर प्रदेशातील सर्व बूथ प्रमुखांची भेट घेतील आणि महत्त्वाकांक्षी योजनेचा प्रारंभ करतील. यानंतर अन्य राज्यातही अशी मोहीम राबविली जाणार आहे. निवडणुकीआधी देशातील प्रत्येक राज्यात मतदारांकडे किमान पाचवेळा भेट देता येईल,असा कार्यक्रम राबविण्याचा भाजपचा संकल्प आहे. यासाठी बूथ स्तरावरील कार्यकर्त्यांना सक्रिय करण्यात येईल. हेच कार्यकर्ते मतदानाच्या दिवशी मतदारांना घराबाहेर काढण्याचे काम करणार आहेत.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल या राज्यांसह ज्या अन्य राज्यात लोकसभेच्या मोठ्या संख्येने जागा आहेत, अशा ठिकाणी ही मोहीम लवकर राबविण्यात येणार आहे. कमी जागा असलेल्या राज्यांमध्ये निवडणूक जवळ आल्यानंतर योजना राबविली जाईल. या कार्यात मतदार यादीचे एक पान सांभाळण्याची कार्यकर्त्यावर सर्वाधिक जबाबदारी असेल.
मतदानासाठी पात्र असलेल्या प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचण्याचे उद्दिष्ट आखण्यात आल्याचे एका पदाधिकाऱ्याने सांगितले. प्रत्येकाने मतदान करावे, ही पाचवेळा घरोघरी भेट देण्यामागील योजना आहे. याशिवाय मागच्या निवडणुकीत कोणत्या मतदाराने मत दिले नव्हते, त्याचे कारण काय, हे देखील शोधण्याचे काम भाजप कार्यकर्ते करतील, असे या पदाधिकाºयाने सांगितले.