निवृत्त अधिकाऱ्यांना भाजप देणार लोकसभेची संधी; अमृतसरमधून संधू, दार्जिलिंगमधून शृंगला निवडणुकीच्या रिंगणात
By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2024 06:09 AM2024-02-28T06:09:19+5:302024-02-28T06:09:35+5:30
यापूर्वी दोनवेळा पराभूत झालेली ही जागा जिंकण्यासाठी भाजपचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत.
- हरीश गुप्ता
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी १८व्या लोकसभेत नवीन प्रतिभा आणण्यासाठी शोध घेत आहेत. त्यासाठी किमान ५० टक्के विद्यमान खासदार बदलण्यास ते उत्सुक आहेत. सत्ताधारी पक्षातून मिळत असलेल्या संकेतांनुसार अमेरिकेतील भारताचे माजी राजदूत तरनजित सिंग संधू यांना अमृतसरमधून भाजपचे लोकसभा उमेदवार म्हणून पसंती मिळू शकते.
यापूर्वी दोनवेळा पराभूत झालेली ही जागा जिंकण्यासाठी भाजपचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. २०१४ मध्ये दिवंगत अरुण जेटली यांनी ही जागा गमावली, तर हरदीपसिंग पुरी २०१९ मध्येही ती जागा जिंकू शकले नाहीत. आता पंतप्रधान मोदींनी वॉशिंग्टनमध्ये चार वर्षे सेवा केल्यानंतर या वर्षी ३१ जानेवारी रोजी पद सोडणाऱ्या संधूंच्या नावावर येऊन पंतप्रधान मोदींचा हा शोध संपला आहे.
पंजाबमध्ये तळ ठोकून
पंजाबचे सुपुत्र असल्याने ते नियमित जेथे जात होते, त्या अमृतसरला थेट गेले. त्यांनी या महिन्याच्या सुरुवातीला सुवर्णमंदिरात नमन केले. ते तेजा सिंग समुंद्री हॉलमध्ये गेले, ज्याचे नाव त्यांच्या आजोबांच्या नावावर ठेवण्यात आले आहे, तसेच दुर्गियाना आणि श्रीराम तीर्थ मंदिरातही गेले. ते पंजाबमध्ये अक्षरशः तळ ठोकून आहेत, विविध व्यावसायिक संस्था आणि स्वयंसेवी संस्थांशी संवाद साधत आहेत.
तामिळनाडूमध्ये सुरू आहे जोरदार तयारी
पुरी विद्यमान राज्यसभा खासदार असले तरी त्यांना दिल्लीतून रिंगणात उतरवले जाऊ शकते, त्याचप्रमाणे जयशंकर यांना तामिळनाडूमधून उमेदवारी दिली जाऊ शकते, जिथे ते विस्ताराचा जोरदार प्रयत्न करत आहेत. भाजपला तामिळनाडूत किमान अर्धा डझन जागा जिंकण्याची आशा आहे आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या व्यतिरिक्त जयशंकर हे एक चेहरा असू शकतात.
माजी परराष्ट्र सचिवांना उमेदवारी
nपश्चिम बंगालमधील दार्जिलिंग लोकसभा मतदारसंघातून आणखी एक माजी परराष्ट्र सचिव हर्षवर्धन शृंगला यांना उमेदवारी देण्याचा विचार भाजप नेतृत्व करत आहे.
n२०१९ मध्ये भाजपने ही जागा जिंकली होती. सध्या तीथे एस. एस. अहलुवालिया खासदार आहेत. शृंगला हे भूमिपुत्र असल्याने त्यांना तेथे आणले पाहिजे, असे म्हटले जात असल्याचे वृत्त आहे.
...तर चार आयएफएस अधिकारी भाजपचे खासदार असतील
आयएफएसमधून दोन नवे चेहरे निवडून आल्यास भाजपकडे असे चार अधिकारी खासदार असतील. माजी परराष्ट्र सचिव एस. जयशंकर हे आधीच परराष्ट्र मंत्री म्हणून काम पाहत आहेत तर हरदिपसिंग पुरी महत्त्वाची मंत्रिपदे सांभाळत आहेत.