लोकमत न्यूज नेटवर्कअहमदाबाद : भाजपाला १९९०च्या दशकात ज्या पटेल समुदायाने भरभरून साथ दिली आणि भाजपाची सर्वात निष्ठावान व्होट बँक म्हणून ज्यांची ओळख होती, तो पटेल समुदाय यंदा भाजपापासून अंतर राखून आहे. गुजरातमध्ये पटेल समुदाय सुमारे १४ टक्क्यांच्या आसपास आहे. तो यंदा भाजपापासून दूर आणि काँग्रेसच्या जवळ खरोखर जाईल का? यावर येथील राजकारण अवलंबून आहे.हा पटेल समुदाय हार्दिक पटेल यांचे आवाहन ऐकणार आहे काय? की फक्त हार्दिक यांच्या सभा व रोड शोमध्ये या समाजाचे लोक व विशेषत: तरुण सहभागी होत आहेत? हार्दिक पटेल यांनी भाजपाला खरोखरच त्रस्त केले आहे काय? गुजरात निवडणुकीत तूर्तास हे सर्वात मोठे प्रश्न झाले आहेत.गुुजरातच्या उत्तर आणि दक्षिण भागात असे काही मतदारसंघ आहेत, जिथे पटेल समुदायाची लोकसंख्या ९ टक्क्यांपेक्षा अधिक आहे. हिरे आणि कापड उद्योगाचे हे केंद्र मानले जाते. गेल्या म्हणजे २०१२ च्या विधानसभा निवडणुकीत हा भाग भाजपाचा गड होता. दक्षिण गुजरातमध्ये भाजपाने २८ जागा जिंकल्या होत्या.यातील २४ जागा आनंद, सूरत, भडोच, नवसारी व वलसाडमधील होत्या. या जागांवरील विजयातील फरक १० टक्क्यांपेक्षा अधिक आहे. यातील तीन जागा ५ ते १० टक्क्यांच्या फरकाने जिंकल्या होत्या. तिथेच काँग्रेसने या वेळी अधिक ताकद लावली आहे, तसेच हार्दिक पटेल व त्याच्या सहकाºयांनीही तिथे जोर लावून, तेथील मते काँग्रेसला मिळतील, असे प्रयत्न चालविले आहेत. भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना यांना मते देऊ नका, भाजपाला पर्याय असलेल्या आणि सत्ता स्थापन करू शकेल, अशा पक्षालाच मते द्या, असे आवाहन हार्दिक पटेलने केले आहे. पटेलांची मते काँग्रेसला मिळावीत, अशाच पद्धतीने त्याचा प्रचार सुरू आहे.उत्तर गुजरात अडचणीचाउत्तर गुजरातमध्ये मात्र परिस्थिती वेगळी आहे. या ठिकाणी पाटण, मेहसाणा, बनासकांठा, गांधीनगर उत्तर आणि दक्षिणमध्ये भाजपाच्या विजयाचे अंतर ५ टक्क्यांपेक्षा कमी होते, तर सुरेंद्रनगर आणि साबरकांठा येथे विजयाचे अंंतर ५ ते १० टक्के होते. अर्थातच, भाजपाची परिस्थिती येथे समाधानकारक नाही. पटेल समुदायातील बदल येथे भाजपावर थेट प्रभाव करू शकतो.पटेल फॅक्टर भाजपाला रोखेल?एकूणच, येथील निवडणुकीचे भाकीत करायचे झाले, तर पटेल फॅक्टरला भाजपाला विजयापासून रोखण्यात यश येते की, केवळ राज्यावरील भाजपाची पकड सैल करणेच हार्दिक पटेल व त्याच्या सहकाºयांना जमते, याकडे साºयांचेच लक्ष लागून राहिले आहे.प्रामुख्याने शहरी असलेल्या या भागावर भाजपाचे वर्चस्व होते. याच भागात विशेषत: सूरतमध्ये हार्दिक पटेल यांना अभूतपूर्व समर्थन मिळत आहे. पटेल (पाटीदार) समुदायाची 10% मते काँग्रेसकडे वळली, तरीही भाजपाला हटविणे एवढे सोपे नाही. मात्र, पटेल समाजाची त्याहून अधिक मते काँग्रेसकडे गेली, तर मात्र भाजपाची चांगलीच पंचाईत होऊ शकते.
भाजपाची गुजरातवरील पकड सैल होणार? हार्दिक पटेलचा प्रभाव नक्की किती? गुजरातमध्ये पटेल मतदार ठरणार निर्णायक घटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2017 1:09 AM