नवी दिल्ली - हिमाचल प्रदेशमध्ये विधानसभा निवडणूक होणार असल्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. राजकीय वातावरण तापलं आहे. एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. याच दरम्यान हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर (Jairam Thakur) यांनी काँग्रेसवर हल्लाबोल करत खोचक शब्दांत टीका केली आहे. सर्वात जुना पक्ष असलेला काँग्रेस गायब झाला आहे आणि देशभरात त्यांच्या फेयरवेल साँगचा आवाज येत असल्याचं म्हटलं आहे. जालोगमध्ये एका जनसभेला संबोधित करताना त्यांनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे.
"एकेकाळी काँग्रेसचा काळ होता. आता मात्र परिस्थिती बदललेली आहे. देशातील काँग्रेसचं अस्तित्व समाप्त झालं आहे. सध्या त्यांचे राष्ट्रीय नेते जामिनावर आहेत. निरोपाचं गाणं देशभर पोहोचलं आहे' अशा शब्दांत जयराम ठाकूर यांनी टोला लगावला आहे. तसेच "हिमाचल प्रदेशमध्ये प्रत्येक पाच वर्षात सत्ताबदल होतो. मात्र यावेळी येथे सत्ताबदल होणार नाही. यावेळी राज्यात पुन्हा एकदा भाजपाची सत्ता येणार आहे. नुकत्याच पाच राज्यांत विधानसभेच्या निवडणुका झाल्या. या निवडणुकांमध्ये त्यांचीच सत्ता येईल असा दावा काँग्रेसचे नेते करत होते. मात्र निकाल वेगळा लागला."
"पंजाबमध्ये तर माजी मुख्यमंत्री चरणजीतसिंग चन्नी दोन्ही ठिकाणांमधून पराभूत झाले. काँग्रेसजवळ फक्त एकच राज्य होते. तेही राज्य काँग्रेसच्या हातातून गेले. तर चारही राज्यांमध्ये पुन्हा एकदा भाजपाची सत्ता आली" असं देखील जयराम ठाकूर यांनी म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. काँग्रेसने राज्यसभा उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यानंतर काँग्रेसमधील काही इच्छुकांनी नाराजी व्यक्त केली. काँग्रेसच्या नेत्या आणि अभिनेत्री नगमा यांनीही ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट करत आपला संताप व्यक्त केला. सोनिया गांधी यांनी राज्यसभेचं वचन दिलं. मात्र आता 18 वर्षांनंतरही या वचनाची पूर्तता झालेली नाही म्हणत नगमा यांनी आपली नाराजी जाहीरपणे व्यक्त केली. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं.
"18 वर्षांची तपस्या इमरान भाईंसमोर कमी पडली, मी पात्र नाही का?"; नगमा यांचा खोचक सवाल
नगमा यांनी दोन ट्वीट केले आहेत. यातील पहिल्या ट्वीटमध्ये त्यांनी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते पवन खेरा यांचं ट्वीट रिट्विट करत आपली 18 वर्षांची तपस्या इमरान भाईंसमोर कमी पडल्याचं मत व्यक्त केलं. पवन खेरा यांनी काँग्रेसची यादी जाहीर झाल्यानंतर केलेल्या ट्वीटमध्ये कदाचित माझी तपस्या काहीशी कमी पडल्याचं म्हटलं आहे. "काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या सांगण्यावरून मी 2003-04 काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. तेव्हा सोनिया गांधी यांनी स्वतः मला राज्यसभेचं आश्वासन दिलं होतं. त्यावेळी काँग्रेस पक्ष सत्तेतही नव्हता. आता या गोष्टीला 18 वर्षे झालेत मात्र त्यांना अद्याप एकही संधी सापडलेली नाही. इमरान यांना महाराष्ट्रातून राज्यसभेवर घेण्यात आलं. मी पात्र नाही का? असा माझा प्रश्न आहे" असं नगमा यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.