धक्कादायक! राजस्थानातील 100 विद्यमान आमदारांचे भाजपा पंख छाटणार

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2018 04:35 AM2018-10-21T04:35:27+5:302018-10-21T04:35:51+5:30

राज्य सरकार आणि स्थानिक आमदारांविषयी लोकांमध्ये असलेल्या रागाचा फटका बसू नये, यासाठी भाजपने राजस्थानात किमान ८० ते १०० नव्या उमेदवारांना संधी देण्याचे ठरविल्याचे समजते.

BJP will not give ticket to 100 sitting MLAs in Rajasthan | धक्कादायक! राजस्थानातील 100 विद्यमान आमदारांचे भाजपा पंख छाटणार

धक्कादायक! राजस्थानातील 100 विद्यमान आमदारांचे भाजपा पंख छाटणार

googlenewsNext

नवी दिल्ली : राज्य सरकार आणि स्थानिक आमदारांविषयी लोकांमध्ये असलेल्या रागाचा फटका बसू नये, यासाठी भाजपने राजस्थानात किमान ८० ते १०० नव्या उमेदवारांना संधी देण्याचे ठरविल्याचे समजते. म्हणजेच विद्यमान ८० ते १०० आमदारांना पुन्हा उमेदवारी मिळण्याची शक्यता कमी आहे.
दोनच दिवसांपूर्वी भाजपचे नेते व मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी भाजपच्या यादीत तुम्हाला काही तरी वेगळे पाहायला मिळेल, त्यामुळे तुम्हाला आश्चर्य वाटेल, असे वक्तव्य केले होते. प्रकाश जावडेकर यांच्याकडे भाजपने यंदाच्या विधानसभा निवडणुकीची जबाबदारी दिली आहे. त्यांच्या वक्तव्यानंतर दोनच दिवसांत भाजप राजस्थानात ८० ते १०० नवे चेहरे देणार असल्याचे उघड झाले आहे.
यंदा भाजपसाठी राजस्थानची विधानसभा निवडणूक अतिशय अवघड मानली जात आहे. विविध सर्वेक्षणातून यंदा भाजपला बहुमत मिळणार नाही आणि काँग्रेसला अधिक संधी आहे, असेच निष्कर्ष आले आहेत. राज्यातील गुज्जर व जाट हे आरक्षणाच्या मुद्यावरून मुख्यमंत्री वसुंधरा राजे सरकारवर संतप्त आहेत. दुसरीकडे वसुधंरा राजे यांच्या कार्यपद्धतीविषयी आमदार व मंत्र्यांमध्येही नाराजीचे वातावरण आहे. त्या अद्याप स्वत:ला राणीसाहेब समजून काम करतात, वागतात, अशा अनेक तक्रारी आहेत.
हे एकीकडे आहे, तर दुसरीकडे अनेक आमदारांविषयी स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे तक्रारी आल्या आहेत. त्यांनी स्वत:हून प्रत्येक आमदाराच्या कामाचा त्यांच्या अ‍ॅपद्वारे डेटा गोळा केला आहे. त्यातून आमदाराची विधानसभेतील आणि मतदारसंघातील कामगिरी, त्याच्यावरील आरोप, त्याने केलेली कामे, त्याचे वागणे ही सारी माहिती त्यांच्याकडे आणि पर्यायाने पक्षाकडे आलेली आहे. त्याआधारेच ८० ते १०० आमदारांचा पत्ता कट होईल, असे एका पदाधिकाऱ्याने सांगितले. 
>यंदा सत्त्वपरीक्षा
गेल्या विधानसभेत २०० पैकी १६० जागांवर भाजपचे उमेदवार निवडून आले होते. काँग्रेसने २५ जागांवर विजय मिळवला होता आणि अन्य पक्ष व अपक्ष मिळून १५ जागांवर विजयी झाले होते. इतके स्पष्ट बहुमत पाच वर्षांपूर्वी मिळालेल्या भाजपला यंदाची निवडणूक खरोखरच अवघड वाटत आहे. मध्यप्रदेशातील ६० ते ७० विद्यमान आमदारांची तिकिटे कापण्याचेही भाजपने ठरविले आहे.

Web Title: BJP will not give ticket to 100 sitting MLAs in Rajasthan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.