विधानसभा निवडणुकीत गुजरातमध्ये भाजपा 150 पेक्षा जास्त जागा जिंकेल - योगी आदित्यनाथ
By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2017 11:23 AM2017-10-23T11:23:50+5:302017-10-23T11:27:33+5:30
गुजरात विधानसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशच्या निकालाची पुनरावृत्ती होईल असा दावा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केला आहे.
नवी दिल्ली - गुजरात विधानसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशच्या निकालाची पुनरावृत्ती होईल असा दावा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केला आहे. गुजरातमध्येही पूर्ण बहुमताने भाजपाचे सरकार सत्तेवर येईल. गुजरातमध्ये भाजपा 150 जागा जिंकेल असा विश्वास योगी आदित्यनाथ यांनी व्यक्त केला. इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हा दावा केला. आमच्या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी 150 जागांचे लक्ष्य ठेवले आहे. आम्ही त्यापेक्षाही जास्त जागा जिंकू असे आदित्यनाथ म्हणाले.
गुजरातमधला विकासाच सर्वकाही सांगून जातो असे योगी म्हणाले. योगींनी या मुलाखतीत काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींवरही सडकून टीका केली. राहुल गांधी फक्त निवडणुकीच्यावेळी सक्रीय असतात. बदलत्या ऋतुमानासारखे राहुल गांधी मोसमी राजकरणी असल्याची टीका त्यांनी केली. राहुल गांधी निवडणुकीच्यावेळी दिसतात. त्यानंतर ते गायब होतात. त्यांचे विकासामध्ये काहीही योगदान नाही असे योगी म्हणाले.
उत्तर प्रदेशातील विकासाच्या मुद्यावरुनही त्यांनी राहुल गांधींवर हल्लाबोल केला. अमेठीच्या विकासासाठीही राहुल गांधींनी काहीही केलेले नाही असे ते म्हणाले. अमेठी हा गांधी कुटुंबाचा परंपरागत मतदारसंघ आहे. गुजरातमधले तरुण नेते भाजपाच्या विरोधात आहेत या प्रश्नावर त्यांनी गुजरातमधल्या जनतेचा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विकासाच्या दूरदृष्टीवर विश्वास आहे असे उत्तर त्यांनी दिले.
मोदी सरकार राम राज्य निर्माण करण्याच्या दिशेने काम करतेय
दु:ख, वेदना नसलेल्या राम राज्याची संकल्पना अयोध्येने दिली. सध्याच्या घडीला सर्वांना घर, वीज आणि प्रत्येक घरामध्ये एलपीजी सिलिंडर मिळाला तर ते ख-या अर्थाने राम राज्य असेल असे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ अयोध्येमध्ये दिवाळीच्या कार्यक्रमात बोलताना म्हणाले होते. योगींनी यंदाची दिवाळी अयोध्येत शरयू नदीच्या तीरावर साजरी केली.
केंद्रातले नरेंद्र मोदी सरकार राम राज्य निर्माण करण्याच्या दिशेने काम करत असून, मोदी सरकारच्या कामामुळे सर्वसामान्य जनतेला जे सुख मिळेल तेच राम राज्य असेल असे योगी म्हणाले. प्रत्येक कुटुंबाच्या डोक्यावर हक्काचे छप्पर असले पाहिजे. 2019 पर्यंत प्रत्येक घरामध्ये शौचालय तसेच वीज मिळाली पाहिजे. पंतप्रधानांचे ते स्वप्न आहे. हेच खरे राम राज्य आहे असे योगी म्हणाले.