- हरिश गुप्तानवी दिल्ली : सरकारवरील अविश्वास ठरावावर चर्चेस आम्ही तयार असल्याचे गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी स्पष्ट केले असले तरी, सत्ताधारी भाजपा त्यास काही कारणांनी बिचकत असल्याचे सध्या तरी दिसत आहे. आपलेच मित्रपक्ष ठरावावर कसे बोलतील याची सध्या भाजपाला भीती वाटते आहे.शिवसेना, जनता दल युनायटेड, अकाली दल, एलजेपी व अन्य सहकारी पक्षांनी एनडीएला समर्थन असल्याचा शब्द दिला असला तरी, काही सहकारी पक्ष सरकारच्या शैलीवर टीका करतील, अशी भाजपाला धास्ती आहे.लोकजनशक्ती पार्टीचे नेते रामविलास पासवान व भारतीय समाज पार्टीचे ओ. पी. राजभोर यांनी केलेल्या ताज्या विधानांमुळे भाजपा नेतृत्वावर लाजिरवाणा प्रसंग ओढावला आहे. भाजपाला लोकसभेत ३२५ जागा मिळाल्यामुळे तो सत्तेच्या नशेत असल्याचे राजभोर म्हणाले आहेत. आपलेच सदस्य भलतेसलते बोलून अडचणीत आणतील, अशीही भाजपाला शंका आहे. विरोधी पक्षांकडे सर्वमान्य नेता नसला तरी विरोधक आता राहुल गांधी यांच्यासह एकत्र येत असल्याची भाजपाला जाणीव झाली आहे. कावेरी मुद्यावरून अण्णा द्रमुकच्या सदस्यांनी लोकसभेत गदारोळ घातला. त्यामुळे अविश्वास ठराव आला नाही. अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी स्पष्ट केले की, जोपर्यंत सभागृहात सुरळीत कामकाज चालत नाही तोपर्यंत कुठल्याही विषयावर कार्यवाही होऊ शकत नाही.गोंधळ कशाला?- कर्नाटक-तामिळनाडू यांच्या कावेरी पाणी वादावर निर्देश देताना सर्वोच्च न्यायालयाने ‘कावेरी व्यवस्थापन बोर्ड’ स्थापण्यासाठी सहा आठवड्यांची मुदत दिली. ही मुदत २९ मार्च रोजी संपत आहे. त्यामुळे बोर्ड स्थापण्याची मागणी अण्णा द्रमुक करत आहे.बोर्ड स्थापन केल्यास कर्नाटक विधानसभा निवडणुकांत फटका बसण्याची भीती असल्याने भाजपा त्यास टाळाटाळ करीत आहे.भाजपाला भीती नाहीप्रत्यक्षात अविश्वास ठराव टाळण्यासाठी भाजपाच्या इशाऱ्यावरूनच अण्णा द्रमुक अडथळे आणत असल्याचा विरोधकांचा आरोप आहे. गदारोळामुळे तेलगू देसम पार्टी व वायएसआर काँग्रेसला अविश्वास ठराव आणण्यात अपयश आले. अध्यक्षांनी मंगळवारपर्यंत कामकाज स्थगित केले. त्या ठरावाला काँग्रेस, डावे पक्ष, तृणमूल काँग्रेस यांचा पाठिंबा आहे, तर अण्णा द्रमुक, बिजद, टीआरएस तटस्थ राहणार आहेत. तरीही भाजपा सावध आहे. संसदीय कार्यमंत्री अनंत कुमार म्हणाले की, भाजपाला भीती नाही.राजू शेट्टी आघाडीच्या वाटेवरस्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष व खासदार राजू शेट्टी यांनी सोमवारी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांची नवी दिल्लीत भेट घेतली. शेतकºयांना संपूर्ण कर्जमुक्ती, दीडपट हमीभाव यासाठी यापुढे एकत्र काम करण्याचा निर्णय या चर्चेत झाला. या भेटीमुळे शेट्टी यांची काँग्रेससोबत आघाडी होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल पुढे पडले आहे.
अविश्वास ठरावावर चर्चा टाळण्याचा भाजपाचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2018 6:24 AM