तिरुअनंतपुरम, दि. 12 - केरळची राजधानी तिरुअनंतपुरम येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) पदाधिकारी एस.राजेश यांच्या हत्येनंतर भाजपा कार्यकर्त्यांमध्ये उफाळून आलेला आक्रोश पाहता भाजपाने केरळमध्ये एक मोठा रोड शो करण्याचा निर्णय घेतला आहे. कन्नूरपासून तिरुअनंतपुरमरर्यंत जवळपास 500 किलोमीटर रोड शोची सुरुवात व शेवट भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह करणार आहेत.
या रोड शोच्या माध्यमातून भाजपा राज्यातील मुख्य विरोधी पक्ष सीपीएमला आक्रमक स्वरुपात राजकीय उत्तर देऊ इच्छिते. विशेष म्हणजे राज्यात सीपीएम आणि भाजपा-आरएसएसमध्ये ब-याच कालावधीपासून हिंसात्मक शत्रूत्व निभावले जात आहे. यावर भाजपाने असा आरोप केला आहे की, सीपीएमच्या नेतृत्वात असलेले सरकार सत्तेत आल्यापासून भाजपा-आरएसएस कार्यकर्त्यांवर वारंवार हल्ले होत आहेत आणि त्यांची हत्याही केली जात आहे.
भाजपामधील सूत्रांनी सांगितले की, ओणमनंतर सप्टेंबर महिन्यातील दुस-या आठवड्यात कन्नूरमधून मेगा रोड शोची सुरुवात होईल. जवळपास एक आठवड्यापर्यंत चालणारा हा रोड शो राज्यातील 10 जिल्ह्यातून होऊन तिरुअनंतपुरममध्ये पोहोचणार. भाजपा या रोड शोकडे फार गांभीर्यानं पाहत आहे. आठवडाभर चालणा-या या रोडशोमध्ये भाजपाशासित राज्यातील मुख्यमंत्री आणि पक्षातील ज्येष्ठ नेते या रोड शोमध्ये सहभागी होणार आहेत. भाजपातील नेत्यांचे असे म्हणणे आहे की, राज्यात भाजपाची पकड मजबूत होत असल्याचे सीपीएम नेत्यांना वाटत आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये भीती पसरवण्याच्या उद्देशाने आरएसएस आणि भाजपा कार्यकर्त्यांची हत्या करण्यात येत आहे. जेणेकरुन राज्यात भाजपाला आपला जम बसवण्याची संधी मिळू नये.
भाजपा नेत्यांचे असेही म्हणणे आहे की, राज्यात गेल्या वर्षभरात भाजपा व आरएसएसमधील एक डझनहून अधिक कार्यकर्त्यांची हत्या करण्यात आली आहे. हत्या करणा-यांना राज्य सरकारचं संरक्षण आहे यामुळे त्यांची जामीनावर सुटका होत आहे आणि बाहेर येऊन ते पुन्हा साक्षीदारांना धमकावतात. भाजपातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आता केरळमध्ये भाजपाची व्हॉटबँक वाढवण्याचे टार्गेट आहे त्यामुळे पक्ष या मोठ्या मोहीमेची सुरुवात करत आहे.