भाजपाचे चाणक्य शहा यांची रणनीती अपयशी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2018 06:41 AM2018-12-13T06:41:52+5:302018-12-13T06:42:21+5:30

लोकसभापूर्वी मोठा फटका; काँग्रेसमुक्त भारताचे स्वप्न जमीनदोस्त

BJP's Chanakya Shah's strategy fails | भाजपाचे चाणक्य शहा यांची रणनीती अपयशी

भाजपाचे चाणक्य शहा यांची रणनीती अपयशी

Next

- नितीन अग्रवाल

नवी दिल्ली : पुढील वर्षीच्या लोकसभा निवडणुकीच्या आधी राजस्थान, मध्यप्रदेश आणि छत्तीसगड विधानसभा निवडणुकीत भाजपाला मोठा फटका बसला. या राज्यांतील निकालांनी पक्षाचे चाणक्य मानले जाणारे अमित शहा यांनी आखलेली रणनीती पूर्णपणे नाकारली गेली. शहा यांचे काँग्रेसमुक्त भारताचे स्वप्न जमीनदोस्त झाले. निवडणुकीत ना भाजपाचा विकासाचा दावा कामी आला ना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जादू, ना राममंदिराची नाव त्याला वाचवू शकली. मतदारांनी छत्तीसगड आणि मध्यप्रदेशात गेल्या १५ वर्षांतील कामाला नाकारलेच सोबत नरेंद्र मोदी सरकारच्या विकास योजनाही भाजपाला विजयी करू शकल्या नाहीत.

निवडणुकीच्या आधी भाजपाने राममंदिर व हिंदुत्वाचा मुद्दा प्रकर्षाने मांडला. शहा आणि नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर मंदिर बनण्यात अडथळे आणल्याचा आरोप केला. संघ आणि त्याच्याशी संबंधित संघटनांनी सर्वोच्च न्यायालयालाही सोडले नाही. तरीही भाजपाला सरकार बनवण्याएवढ्या जागा मिळाल्या नाहीत.

भाजपाने ३ राज्यांतील सुमारे २० ते ३० टक्के विद्यमान आमदारांना तिकिटे नाकारली. सत्तेच्या विरोधातील लाटेचा फटका चुकवण्यासाठी गुजरात मॉडेल स्वीकारून अनेक ठिकाणी मंत्र्यांनाही तिकीट नाकारले. युवकांना प्राधान्य दिले गेले. भाजपाची यात मोठी हानी झाल्याचे बोलले जाते. तिकिटे नाकारलेले भाजपासाठी भस्मासुर बनले. त्यांनी आपल्याच पक्षाच्या उमेदवारांच्या यशाचा खेळ उधळून लावला.
सोशल मीडियाही कामाला आला नाही. अविश्रांतपणे निवडणुकीच्या तयारीत असलेले शहा फार पूर्वीपासून प्रत्येक राज्यात बुथस्तरीय कार्यकर्ता संमेलन घेत आले. पन्नाप्रमुखांच्या साह्याने मतदारांना प्रभावित करण्याची व्यापक व दूरगामी रणनीतीही त्यांनी बनवली. सोशल मीडिया वॉरियर्सची मोठी फौजही त्यांच्या कामाला आली नाही. भाजपा त्यांच्या साह्याने व्हर्च्युअल वर्ल्डमध्ये काँग्रेसविरोधात आक्रमक होत गेली; परंतु पक्षाचा पराभव टळला नाही.

पक्षाचे नेते शत्रुघ्न सिन्हा यांनी निकालांना भाजपाचा अहंकार जबाबदार असल्याचे सांगितले. सिन्हा यांनी टष्ट्वीट केले की, ‘जे निवडणूक हरले त्यांचा अहंकार, अतिआत्मविश्वास व खालावलेली कामगिरी कारणीभूत ठरली. त्यांना लवकरच सुबुद्धी मिळावी, अशी आशा आणि प्रार्थना करतो. जेवढी लवकर येईल तेवढे चांगले. लोकशाही विजयी होवो. जय हिंद!’

तिन्ही राज्यांच्या नेतृत्वात लवकरच बदल अपेक्षित
निवडणुकीनंतर मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानातील नेतृत्वात मोठे बदल अपेक्षित आहेत. शिवराज चौहान, रमणसिंह आणि वसुंधरा राजे यांना आगामी लोकसभा निवडणूक पाहता भाजपा आता त्यांना केंद्रात आणू शकते. या तिन्ही राज्यांत असे नेतृत्व उभे केले जाईल की, ज्याच्या आधारे पक्ष २०१९ मधील निवडणुकीत जनतेला सामोरे जाऊ शकेल.

शहा यांची रणनीती याआधीही ठरलीय अपयशी
शहा यांची रणनीती अपयशी ठरण्याची ही काही पहिली वेळ नाही. या आधी त्यांच्या नेतृत्वाखाली दिल्ली, बिहार आणि कर्नाटकमध्ये भाजपाला सत्तेची चव चाखता आली नाही. मोदी-शहा जोडीने त्यांच्या राज्यात यशाचे जे दावे केले होते तेथेही यश मिळाले नव्हते. पाच राज्यांच्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर भाजपा नेते पत्रकारांच्या प्रश्नांना टाळताना दिसले. सोशल मीडियात अति सक्रिय असलेला भाजपा जवळपास सायलेंट मोडवर आला.

Web Title: BJP's Chanakya Shah's strategy fails

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.