इंधन दरवाढीमुळे भाजपाच्या 'या' ताई पुन्हा सोशल मीडियावर व्हायरल !
By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2018 11:08 AM2018-05-23T11:08:14+5:302018-05-23T12:09:35+5:30
महागाई आणि आर्थिक विकासाच्या मुद्द्यावरून भाजपानं 2013मध्ये काँग्रेसचं सरकार असताना सातत्यानं महागाईवरून आगपाखड केली. तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग आणि यूपीए अध्यक्षा सोनिया गांधींवर टीका केली जात होती.
नवी दिल्ली- महागाई आणि आर्थिक विकासाच्या मुद्द्यावरून भाजपानं 2013मध्ये काँग्रेसचं सरकार असताना सातत्यानं महागाईवरून आगपाखड केली. तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग आणि यूपीए अध्यक्षा सोनिया गांधींवर टीका केली जात होती. तसेच 2014च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान मोदी सरकारनं वाढत्या महागाईच्या मुद्द्यावर अनेक व्हिडीओ जाहिरातीही शेअर केल्या होत्या. आता त्याच जाहिरातींचे व्हिडीओ सोशल मीडियावर पुन्हा व्हायरल होत आहे. त्या व्हिडीओमध्ये एक महिला दिवसेंदिवस वाढणा-या महागाईवर काँग्रेस सरकारला दूषणं लावताना पाहायला मिळतेय. परंतु पेट्रोलचे भाव 80च्या पार गेल्यानंतर आता तेच व्हिडीओ नेटिझन्सनी सोशल मीडियावर व्हायरल करून भाजपावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न चालवला आहे.
सध्या तरी वाढत्या महागाईच्या मुद्द्यावर सोशल मीडियावर भाजपाच्या ताईच खूप व्हायरल होत आहेत. भाजपानं या ताईंसोबतच काँग्रेसवर टीका करणा-या अनेक जाहिराती प्रसिद्ध केल्या होत्या. आता त्याच जाहिराती सोशल मीडियावर पुन्हा व्हायरल झाल्यानं भाजपाची कोंडी झालीय. विशेष म्हणजे याआधी यूपीए सरकारच्या काळात 2013मध्ये आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चे तेल 141 डॉलरवर असताना राज्याच्या काही भागात पेट्रोल 85 रुपये प्रति लिटरवर गेले होते. आता मात्र कच्चे तेल 80-82 डॉलरदरम्यान असतानाच दर भडकले आहेत.
यूपीए सरकारच्या काळात कच्चे तेल 80 डॉलर असताना पेट्रोल 60 व डिझेल 48 रुपये प्रति लिटरच्या घरात होते. गेल्या 9 दिवसांमध्ये पेट्रोलचे भाव लिटरमागे 2.24 रुपये तर डिझेलचे भाव 2.15 रुपयांनी वाढले आहेत. या वाढत्या दरांमुळे रोष वाढत आहे. ते पाहून पेट्रोलियममंत्री धर्मेंद्र प्रधान, भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी आम्ही लवकरच मार्ग काढू असे सांगितले. डिझेलचे दर कमी न केल्यास 20 जूनपासून बेमुदत संप करू, असा इशारा ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेसने (एआयएमटीसी) दिला आहे.