कर्नाटकमध्ये भाजपकडून चोरटी शिकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2019 05:33 AM2019-07-10T05:33:31+5:302019-07-10T05:33:58+5:30
काँग्रेसचा आरोप; लोकसभेतून सभात्याग, राज्यसभाही तहकूब
नवी दिल्ली : चोरटे ज्या पद्धतीने शिकार करतात, त्या पद्धतीचे राजकारण भाजपकडून कर्नाटकमध्ये सुरू आहे, असा आरोप करीत काँग्रेसच्या खासदारांनी मंगळवारी लोकसभेतून सभात्याग केला. मात्र, या आरोपाचा भाजपने इन्कार केला आहे.
कर्नाटकमध्ये काँग्रेस व जनता दल (एस)च्या काही आमदारांनी राजीनामे देऊन कुमारस्वामी सरकारचा पाठिंबा काढून घेतला. हे राजीनामे मंजूर झाल्यास ते सरकार कोसळू शकते. या घडामोडींचा मुद्दा काँग्रेसने लोकसभेत शून्य प्रहरात उपस्थित करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याला लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी परवानगी नाकारली. या विषयावर सोमवारी चर्चा झाली असून, केंद्रीय मंत्री राजनाथसिंह यांनी त्याला उत्तरही दिले आहे, असे बिर्ला यांनी सांगितले.
यावर काँग्रेसचे लोकसभेतील गटनेते अधीररंजन चौधरी म्हणाले की, कुमारस्वामी सरकारला भाजपाकडून लक्ष्य केले जात आहे. कर्नाटकमध्ये आज जे सुरू आहे ते उद्या मध्यप्रदेशमध्ये सुरू होईल. चोरट्या शिकारीचे हे राजकारण थांबले पाहिजे. त्यांना प्रत्युत्तर देताना राजनाथसिंह म्हणाले की, कर्नाटकमध्ये काँग्रेस व जनता दल (एस)मध्ये जे सुरू आहे, तो त्यांचा अंतर्गत मामला आहे. अशा मुद्यांवर आम्ही सभागृहाचे कामकाज विस्कळीत होऊ देणार नाही. त्यानंतर संतप्त काँग्रेस सदस्यांनी भाजपाविरोधात घोषणा दिल्या. काही वेळाने काँग्रेस व द्रमुकच्या सदस्यांनी सभात्याग केला.
कुमारस्वामी सरकार पाडण्यासाठी सुरू असलेल्या हालचालींचा तीव्र निषेध करीत काँग्रेसने राज्यसभेत गदारोळ माजविल्याने सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले.
सकाळी कामकाज सुरू होताच काँग्रेसच्या सभापतींसमोरील हौद्यात जमा होऊन भाजपाविरोधात घोषणा दिल्या.
त्यातच सार्वजनिक उपक्रमांचे खासगीकरण केले जात असल्याच्या निषेधार्थ तेलुगू देसमच्या सदस्यांनीही घोषणाबाजी सुरू केली. दुपारच्या सत्रात प्रश्नोत्तराच्या तासाच्या वेळीही हा गदारोळ आणखी वाढला होता.
राहुल गांधी यांनी दिल्या घोषणा
‘तानाशाही बंद करो’, ‘शिकार की राजनीती बंद करो बंद करो’, अशा घोषणा काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी मंगळवारी मोदी सरकारविरोधात लोकसभेत दिल्या.
या घोषणा लिहिलेले फलक उंचावून व घोषणाबाजी करून काँग्रेसच्या खासदारांनी निषेध व्यक्त केला. कर्नाटकमध्ये भाजपाकडून लोकशाहीची हत्या करण्यात येत असल्याचा आरोप काँग्रेसने केला.