जोधपूरः दोन काळवीटांची शिकार करणारा बॉलिवूडचा 'टायगर' अभिनेता सलमान खान अखेर २० वर्षांनी जेरबंद झाला आहे. जोधपूर कोर्टाने सलमानला पाच वर्षांचा तुरुंगवास आणि १० हजार रुपये दंड ठोठावला असून त्याची रवानगी सेंट्रल जेलमध्ये केली जाणार आहे.
सलमानला तीन वर्षांपेक्षा कमी शिक्षा झाली असती, तर त्याला जोधपूर कोर्टातच जामीन मिळू शकला असता आणि कदाचित त्याला तुरुंगात जावं लागलं नसतं. परंतु, गुन्ह्याचं स्वरूप, सगळे पुरावे आणि बिष्णोई समाजाच्या भावना लक्षात घेऊन जोधपूर कोर्टाने सलमानला पाच वर्षांची शिक्षा सुनावली. त्यामुळे आता जामिनासाठी त्याला वरच्या कोर्टात जावं लागणार आहे आणि त्यात काही कालावधी जाऊ शकतो. त्यामुळे किमान आजची रात्र तरी सलमानचा जेलमध्येच काढावी लागेल.
काळवीट प्रकरणात सलमानला मोठा धक्का बसला असला तरी सहआरोपी अभिनेता सैफ अली खान, तब्बू, नीलम आणि सोनाली बेंद्रे यांची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. सलमान खानला शिक्षा सुनावल्यानंतर न्यायालयाबाहेर उभ्या असलेल्या बिष्णोई समाजातील नागरिकांनी सलमान खान मुर्दाबाद अशा घोषणाही दिल्या. तत्पूर्वी आज सुनावणी सुरू होताच सर्वात आधी सलमान खान याला त्याच्यावर ठेवण्यात आलेले आरोप मान्य आहेत का, असे विचारण्यात आले होते. पण त्याने आपल्यावरील सर्व आरोप फेटाळले होते. अन्य सैफ अली खान, तब्बू, सोनाली बेंद्रे, नीलम या कलाकारांनीही त्यांच्यावरील आरोप फेटाळले होते. शिकार करण्यासाठी सलमानला भरीस घातल्याचा आरोप या कलाकारांवर ठेवण्यात आला होता. परंतु न्यायालयाने सलमान खान यानेच काळवीटांची शिकार केल्याचे म्हटले. इतर कलाकार केवळ त्याठिकाणी हजर होते. त्यामुळे सलमानला या प्रकरणी दोषी ठरवण्यात आले, तर अन्य कलाकारांना दोषमुक्त करण्यात आले. जोधपूर ग्रामीण जिल्हा मुख्य न्यायदंडाधिकारी देवकुमार खत्री यांनी हा निकाल दिला.