Blackbuck poaching case- सलमानला जेलमध्ये धाडणारा 'बिष्णोई समाज' नक्की आहे तरी कोण ?
By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2018 04:28 PM2018-04-05T16:28:01+5:302018-04-05T16:28:01+5:30
जोधपूर न्यायालयाने काळवीट शिकार प्रकरणात अभिनेता सलमान खानला दोषी ठरवत त्याला पाच वर्षांचा तुरुंगवास आणि 10 हजारांच्या दंडाची शिक्षा सुनावली.
राजस्थानः जोधपूर न्यायालयाने काळवीट शिकार प्रकरणात अभिनेता सलमान खानला दोषी ठरवत त्याला पाच वर्षांचा तुरुंगवास आणि 10 हजारांच्या दंडाची शिक्षा सुनावली. तब्बल 20 वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर हा खटला निकाली निघाला. राजस्थानमधील बिष्णोई समाजाने केलेला पाठपुरावा या खटल्यात महत्त्वपूर्ण ठरलाय. परंतु हा बिष्णोई समाज म्हणजे नेमका आहे तरी कोण ?
जोधपूरमधल्या खेडजली गावात 1736 सालापासून बिष्णोई समाज खेजरीच्या झाडांची रक्षा करतोय. हा गाव नेहमीच हिरवळीनं सजलेला असायचा. परंतु काही विघ्नसंतोषी लोक खेजरीची झाडं कापण्यासाठी खेडजलीमध्ये पोहोचले. परंतु बिष्णोई समाजाच्या लोकांनी त्यांना खेजरीची झाडं तोडू देण्यास विरोध केला. झाडांना कापू नका असा तगादा लावूनही गावक-यांना न जुमानता त्या लोकांनी झाडे तोडण्याचा उपद्व्याप सुरूच ठेवला. अखेर खेडजलीची राणी अमृतादेवी बिष्णोईनं गुरू जाम्भेश्वरांची शपथ घेत झाडांना मिठी मारली आणि झाडं तोडू न देण्याचा इशारा दिला. त्यानंतर इतर गावक-यांनी तिच्या पाठोपाठ झाडांना आलिंगन दिली. परंतु झाडं तोडण्यासाठी आलेल्या विघ्नसंतोषी लोकांनी अमृतादेवी बिष्णोईनं झाडापासून दूर सारत त्यांना ठार मारलं. त्यानंतर या हिंसाचारात 363 बिष्णोई समाजाच्या लोकांना प्राण गमवावे लागले असून, त्यांना शहिदाचा दर्जा देण्यात आला. त्यामुळे आता प्रत्येक वर्षी खेडजली गावात एका जत्रेचंही आयोजन केलं जातं. अमृता देवीच्या नावानं केंद्र व राज्य सरकार अनेक पुरस्कारही देत असते.
- काय आहेत बिष्णोई समाजाच्या चालीरिती ?
बिष्णोई समाजाला हे नाव भगवान विष्णूंकडून प्राप्त झाल्याची आख्यायिका सांगितली जाते. बिष्णोई समाजाचे लोक पर्यावरणाचे पूजक असतात. या समाजातील जास्त करून लोक जंगल आणि वाळवंटात राहण्याला पसंती देतात. त्यांची मुलं जंगली प्राण्यांबरोबर खेळता-खेळता मोठी होतात. बिष्णोई समाजातील लोक हिंदूंचे गुरू श्री जम्भेश्वर यांना देव मानतात. या समाजातील लोक त्यांच्या 29 नियमांचं कडकरीत्या पालन करतात. बिष्णोई समाज 29 नियमांचं पालन करतो. 29 नियमांचं पालन करत असल्यानेच बिष्णोई शब्द 20(बीस) आणि 9(नौ)पासून तयार होतो. 1485मध्ये बिष्णोई समाजाची स्थापना झाली. बिष्णोई समाजातील महिला जंगली जनावरांचं पालन-पोषण करत असून, त्यांचा आपल्या मुलांसारखा सांभाळ करतात. या समाजातील महिलाच नव्हे तर पुरुषही बेवारस असलेल्या हरणांच्या पिल्लांचं घरातील एखाद्या सदस्यासारखंच पालन-पोषण करतात.