लखनऊ, दि. 29 - ब्लू व्हेलचा विळखा अद्यापही कायम असून उत्तर प्रदेशातील हमीरपूर येथे एका 13 वर्षाच्या अल्पवयीन मुलाने आत्महत्या केल्याची माहिती मिळाली आहे. आतापर्यंत 100 हून अधिक तरुणांना आत्महत्या करण्यास भाग पाडणा-या ब्लू व्हेल गेमच्या नादापायी तरुणाने आत्महत्या केल्याचा संशय आहे. ब्लू व्हेल गेममध्ये एकूण 50 टास्क असतात, ज्यामध्ये आत्महत्या करणे हे शेवटचं आव्हान असतं.
रविवारी संध्याकाळी तरुणाने आपल्या आईचा मोबाइल फोन घेतला आणि रुममध्ये गेला. वारंवार आवाज देऊनही मुलगा रुममधून बाहेर येत नसल्याने आईने रुममध्ये जाण्याचा प्रयत्न केला. पण रुम आतून लॉक करण्यात आली होती. यानंतर त्याच्या वडिलांनी रुमचा दरवाजा तोडला असता, मुलगा पंख्याला लटकलेला आढळला. त्याने आत्महत्या केली होती.
पोलीस अधिकारी अभिषेक यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'गेल्या काही दिवसांपासून तरुण तासनतास मोबाईलवर घालवत होता. त्याच्या वागण्यातही फरक आला होता. पण त्याच्या आई-वडिलांना आपला मुलगा ऑनलाइन गेमच्या जाळ्यात अडकला असल्याची अजिबात कल्पना नव्हती. त्याने आपल्या आईला रविवारी दुपारी गोड पदार्थ करायलाही सांगितलं होतं'. 'तरुणाने आपल्या आई-वडिलांना त्यांचं आयुष्य धोक्यात असल्याचा इशारा दिला होता', असंही पोलीस अधिकारी अभिषेक यादव यांनी सांगितलं आहे.
पोलिसांनी तपासाला सुरुवात केली असून यामागे अन्य कोणतं कारण आहे का याचाही तपास केला जात आहे. कुटुंबाने पोलिसांनी पोस्टमॉर्टम न करण्याची विनंती केली असून त्यांनी ती मान्य केली आहे. पोलिसांना मोबाइल फोन फुटलेल्या अवस्थेत आढळला आहे. त्यांनी तपासासाठी फोन ताब्यात घेतला आहे.
काय आहे ब्ल्यू व्हेल चॅलेंज गेम?ब्लू व्हेल हा एक व्हिडीओ गेम असून 2013मध्ये रशियामधून या खेळाची सुरुवात झाली. हा गेम खेळणा-याला 50 चॅलेंजेस मिळतात. फिलिपनं लोकांसोबत विशेष करुन 20 वर्षांपर्यंतच्या मुला-मुलींना टार्गेट करुन त्यांच्यासोबत ऑनलाइन संपर्क वाढवण्यास सुरुवात केली. याद्वारे तो लोकांना स्वतःबाबत माहिती देण्यास सांगायचा, स्काइपवर त्यांच्यासोबत बोलायचा. यावेळी तो कमकुवत लोकांची निवड करायचा. लोकांची निवड झाल्यानंतर अॅडमिन खेळाडूंना रोज एक टास्क देतात, हा टास्क 50 दिवसांमध्ये पूर्ण करायचा असतो. गेमची सुरुवात सोप्या टास्कने होते. मात्र यानंतर कठीण-कठीण टास्क दिले जातात. टास्कमध्ये हाताच्या नसा कापणे, जनावराला मारणे व अंतिम टप्प्यात आत्महत्या करायला सांगितली जाते. प्रत्येक टप्पा पार केल्यानंतर फोटोंच्या रुपात स्टोर करायचा असतो.
यामध्ये कुटुंब व मित्रांशी संपूर्ण संबंध तोडणे, स्वत:ला इजा करून घेणे यांचा समावेश आहे. याचे चित्रण गेमच्या क्युरेटरला पाठवावे लागते, जेणेकरून दिलेले आव्हान पूर्ण होण्याची खात्री होते. अखेर पर्यवेक्षक सहभागींना आत्महत्या करण्याचे आव्हान देतो. गेम डाउनलोड केला की, तो डिलिट होत नाही. वापरकर्त्याची वैयक्तिक माहितीदेखील हॅक होण्याची शक्यता असते. एक-एक टप्पा पार केल्यानंतर फोटोंच्या स्वरुपात पुरावा द्यावा लागतो त्यानंतरच खेळाडू पुढील टप्प्यासाठी पात्र ठरतो.