कार गहाण ठेवल्यावर मृतदेह दिला, गुजरात रुग्णालयातील प्रकार
By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2021 07:33 AM2021-04-16T07:33:08+5:302021-04-16T07:33:45+5:30
Gujarat :रुग्णालयाने मृतदेह ताब्यात देण्यास नकार दिला. रुग्णालयाने नातेवाइकांकडे बिलाचे पूर्ण पैसे मागितले. त्यावेळी त्यांच्याकडे तेवढे पैसे नव्हते
वलसाड : वापी (जिल्हा वलसाड) येथील प्रसिद्ध खासगी रुग्णालयात मरण पावलेल्या व्यक्तीचा मृतदेह त्याच्या नातेवाइकांना त्यांच्याकडील कार रुग्णालयाकडे गहाण ठेवल्यावर अंत्यसंस्कारासाठी मिळाला. तेथील डॉक्टरने रुग्णालयाचे बिल पूर्ण भरल्याशिवाय मृतदेह ताब्यात देणार नाही, असे सांगितले, असा नातेवाइकांचा आरोप आहे. या रुग्णालयात आठवड्यापूर्वी सरी गावातील एक जण कोविडची शंका असल्यामुळे दाखल झाला होता. मंगळवारी त्याचा मृत्यू झाला.
रुग्णालयाने मृतदेह ताब्यात देण्यास नकार दिला. रुग्णालयाने नातेवाइकांकडे बिलाचे पूर्ण पैसे मागितले. त्यावेळी त्यांच्याकडे तेवढे पैसे नव्हते. होती फक्त एक कार. मृतदेह ताब्यात देण्यासाठी रुग्णालयाने ती कार गहाण म्हणून ठेवून घेतली व मृतदेह दिला. नंतर नातेवाइकांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली.
पोलीस रुग्णालयात आल्यावर रुग्णालयाने दबाबातून कार परत केली. रुग्णालयाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. अक्षय नाडकर्णी यांचे म्हणणे असे की, ‘आम्ही बिलाचे काही पैसे कमी केलेही होते. परंतु, नातेवाइकांनी बिलाचा भरणा केला नाही.’