लहान मुलांवर लक्ष ठेवा, असं कायम सांगितलं जातं. लहान मुलांना एकटं ठेवू नका. त्यांच्याकडे दुर्लक्ष करू नका. त्यांच्या आसपास काही धोकादायक नाही ना, याची सातत्यानं खातरजमा करत जा. अन्यथा ते मुलांसाठी धोकादायक ठरू शकतं. गुजरातच्या सूरतमध्ये काळीज हेलावून टाकणारी घटना घडली आहे. आठव्या मजल्यावरून खाली कोसळल्यानं एका चिमुकल्याचा मृत्यू झाला आहे.
सूरतमधील एक लहान मुलगा आठव्या मजल्यावरून कोसळला. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली. दोन वर्षांचा चिमुरडा आठव्या मजल्यावरील लॉबीत खेळत होता. खेळता खेळता तो एका टोकाला आला. त्या ठिकाणी स्टिलचे ग्रील बसवण्यात आले होते. चिमुरडा त्यातून खाली वाकून पाहत होता. तितक्यात त्याचा तोल गेला आणि तो खाली पडला.
आठव्या मजल्यावरून खाली कोसळलेल्या चिमुकल्याचा जागीच मृत्यू झाला. मिहिर दवे असं त्याचं नाव होतं. ७० फूट उंचीवरून खाली कोसळल्यानं मिहिरच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्याच्या शरीराच्या इतर भागांनाही इजा झाली. मिहिरच्या कुटुंबातील व्यक्ती त्यांच्या दैनंदिन कामात व्यस्त असताना ही घटना घडली.