नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीसाठी उत्तर प्रदेशात बहुजन समाज पार्टी आणि समाजवादी पार्टीनं हातमिळवणी केल्यानंतर दोन्ही पार्टीतील कार्यकर्ते प्रचंड उत्साहात दिसत आहेत. सपा-बसपा कार्यकर्त्यांचा उत्साह मंगळवारी बसपाच्या सर्वेसर्वा मायावती यांच्या जन्मदिवशीदेखील पाहायला मिळाला. पण उत्साहाच्या भरात कार्यकर्ते काहीही बरळत असल्याचे पाहायला मिळत आहे. मुरादाबादमध्ये बसपा अध्यक्ष मायावती यांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी जमलेल्या कार्यकर्त्यांनी 'जय भीम'च्या घोषणा देत भाजपा आणि काँग्रेसविरोधात जोरदार नारेबाजी केली. यावेळेस, बसपा नेते विजय यादव यांनी व्यासपीठावरुन उपस्थितांना संबोधित करताना काँग्रेसवर तिखट शब्दांत हल्लाबोल केला, तर भाजपाला धमकीवजा इशाराही दिला. यावेळेस, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपावर निशाणा साधताना यादव यांची जीभ घसरली.
'भाजपावाल्यांना पळवून पळवून मारणार', असे विधान विजय यादव यांनी केले. पुढे काँग्रेसला टार्गेट करत ते म्हणाले की, ''काँग्रेस पार्टीनं चार गांधी दिले...इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी आणि राहुल गांधी. भाजपानं काय दिलं, नीरव मोदी, ललित मोदी आणि अंबानीच्या मांडीवर बसलेले नरेंद्र मोदी.''
ते इथेच थांबले नाहीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधताना यादव म्हणाले की, 'नरेंद्र मोदी यांनी केवळ उद्योगपतींसाठीच काम केले आहे. गरीबांसाठी काहीच केले नाही. आगामी काळात निवडणुका होणार आहेत. अजून लढाई बाकी आहे. त्यामुळे घाबरू नका. या भारतीय जनता पार्टीवाल्यांना पळवून पळवून मारणार. ' यानंतर भाजपावर टीका करताना यादव यांच्या भाषेची पातळी अधिकच घसरल्याचे दिसले.
'आता यांना (भाजपाला) आपली मेलेली आजी आठवेल. कारण सपा-बसपा एकत्र झाले आहेत. सपा-बसपाला एकाच व्यासपीठावर पाहून सर्वजण बेशुद्ध होतील', असं यादव म्हणालेत.
यादव यांनी आपल्या भाषणाचा शेवट, 'जय भीम जय भारत. जय बहन मायावती और जय अखिलेश भैया. बाकी सबका निकल गया तेल, भैया अब चलेगा सपा-बसपा का खेल', असे वाक्य म्हणून केला.