नवी दिल्ली: अनुसूचित जाती आणि जमाती कायद्यातील सुधारणांचं विधेयक लोकसभेत मंजूर झाल्यानं बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्षा मायावती यांनी आनंद व्यक्त केला आहे. कायद्यात करण्यात आलेल्या सुधारणांचं आपण स्वागत करत असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. मात्र आता अल्पसंख्यांकांना आर्थिक आधारावर आरक्षण देण्याची मागणी करत मायावतींनी मोदी सरकारसमोर नवा पेच निर्माण केला आहे. गरीब मुस्लिमांना स्वतंत्र आरक्षण देण्याची व्यवस्था असायला हवी, असंही त्या म्हणाल्या आहेत.अनुसूचित जाती आणि जमाती कायद्यात सुधारणा करणारं विधेयक लोकसभेनं मंजूर केलं आहे. आता या विधेयकाला राज्यसभेतही मंजुरी मिळेल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. दलित समुदायानं 2 एप्रिलला भारत बंद पुकारल्याचा हा परिणाम असल्याचं मायावती म्हणाल्या. याचं श्रेय बसपाच्या कार्यकर्त्यांनादेखील जातं, असंही त्यांनी म्हटलं. अनुसूचित जाती-जमाती कायद्यातील सुधारणांचं आम्ही स्वागत करतो. यासाठी देशातील जनतेनं सरकारला भाग पाडलं. हे विधेयक राज्यभेतदेखील मंजूर होईल, अशी अपेक्षा आहे, असं त्या म्हणाल्या.
आर्थिक आधारावर गरीब मुस्लिमांना आरक्षण द्या- मायावती
By ऑनलाइन लोकमत | Published: August 07, 2018 11:28 AM