खंडणीसाठी दाऊदची धमकी बसपा आमदाराची तक्रार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2018 05:49 AM2018-08-13T05:49:36+5:302018-08-13T05:49:54+5:30
कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमने १ कोटी रुपयांच्या खंडणीसाठी आपल्याला जीवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार बहुजन समाज पार्टीचे आमदार उमाशंकर सिंह यांनी पोलिसांत रविवारी दाखल केली.
लखनऊ - कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमने १ कोटी रुपयांच्या खंडणीसाठी आपल्याला जीवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार बहुजन समाज पार्टीचे आमदार उमाशंकर सिंह यांनी पोलिसांत रविवारी दाखल केली.
उत्तर प्रदेशच्या बलिया जिल्ह्यातील रासरा येथून निवडून आलेले आमदार उमाशंकर सिंह यांनी पत्रकारांना सांगितले, ‘स्वत:चे इ-मेल अकाऊंट जरा एकदा तपासा, असा एक संदेश मोबाइलवर ६ आॅगस्ट रोजी आला होता. पण त्यावेळी मी दिल्लीत असल्याने नंतर इ-मेल पाहू असा विचार करुन तो संदेश मी फार गांभीर्याने घेतला नाही. ८ आॅगस्टला पुन्हा एका विशिष्ट मोबाइल क्रमांकावरुन मला संदेश आला की, हा अखेरचा इशारा आहे. जिवंत राहायचे आहे की मरायचे आहे? १ कोटी द्या, असे त्यात लिहिलेले होते.'
उमाशंकर सिंह म्हणाले, ‘जेव्हा मी इ-मेल पाहिले तेव्हा एका मेलमध्ये दाऊद इब्राहिमचे छायाचित्र जोडलेले दिसले. त्यासोबतच्या मजकूरात लिहिले होते की, आम्हाला १ कोटी रुपये द्या अन्यथा खलास करण्यासाठी बंदुकीची एकच गोळी पुरेशी आहे. आम्ही तुम्हाला केव्हाही ठार मारु शकतो.' ज्या मोबाइल क्रमांकावरुन दोन संदेश पाठविण्यात आले तो नंबर ट्रुकॉलरवर शोधले तर तिथे दाऊद इब्राहिमचे नाव आले.