Budget 2020: अर्थसंकल्पाचे संकेत; २०२४ मध्येही मोदीच असतील भाजपचे महानायक
By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2020 04:46 AM2020-02-02T04:46:10+5:302020-02-02T06:43:04+5:30
योजनांच्या पूर्ततेच्या तारखा निवडणूक वर्षाच्या तोंडावर
- संतोष ठाकूर
नवी दिल्ली : अर्थसंकल्पावर विरोधी पक्षही कितीही टीका करीत असले तरी भाजपच्या नजरेतून तो निवडणुकांचा आशावाद आणि राजकीय शक्यतांनी भरलेला आहे. विशेषत: पंतप्रधान नरेंद्र मोदी हे २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत पुन्हा एकदा भाजपचे केंद्रीय नायक बनण्याच्या दिशेने हा अर्थसंकल्प पूर्णपणे तयार दिसतो आहे. मग त्या रेल्वेशी संबंधित योजना असोत की शेतकऱ्यांशी नाही तर रस्त्यांशी. या बहुतेक सगळ्या योजना संपण्याचे वर्ष आहे २०२३ किंवा २०२४.
सार्वत्रिक निवडणुका होतील २०२४ मध्ये. या पार्श्वभूमीवर भाजप या योजनांना पूर्ण करून त्या वर्षात त्यांचा राजकीय लाभ घेण्याची व्यूहरचना करू शकतो आणि या योजनांचे शिल्पकार पंतप्रधान नरेंद्र मोदीच त्या वेळीही भाजपचे केंद्रीय नायक असू शकतील. नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील प्रकल्प बुलेट ट्रेनला पुन्हा एकदा अर्थसंकल्प कालावधीत पूर्ण करण्याचा निर्धार व्यक्त केला गेला आहे. रेल्वे बोर्डचे अध्यक्ष व्ही. के. यादव यांनीही म्हटले की, आम्ही वेळेच्या आत तो पूर्ण करू.
बुलेट ट्रेन पूर्णत्वाची नियोजित तारीख ही २०२३ आहे. यासोबत अर्थसंकल्पातदिल्ली-मुंबईदरम्यान नव्या महामार्गालाही २०२३-२०२४ पर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. सीमेवरील रस्त्यांचे जाळेही पूर्ण करण्याचे वर्ष २०२४ ठेवण्यात आले आहे. अर्थसंकल्पात शेतकºयांना शेतीसाठी ब्लू इकॉनॉमीद्वारे गाव-खेड्यांत रोजगार आणि उत्पन्नाची साधने वाढवणे, ‘समुद्र मित्र बनवा’सारख्या योजनांनाही येत्या पाच वर्षांत पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवले गेले आहे.
पुन्हा एकदा मोदी मॅजिक...
दिल्ली - मुंबई आणि दिल्ली - कोलकाता रेल्वे मार्गांवरील रेल्वेंचा येत्या पाच वर्षांत वेग वाढवून, डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोरला पूर्णपणे सुरू करून दिल्लीहून महाराष्ट्र आणि दक्षिण भारत तथा दिल्लीहून बिहार-पश्चिम बंगालसह संपूर्ण ईशान्य-पूर्व भारतात लोकांना मागणीनुसार रेल्वे प्रवास करण्याचे मोठे लक्ष्यही अर्थसंकल्पात ठेवले गेले आहे. जर या सगळ्या योजना पाच वर्षांत पूर्ण झाल्या तर पुढील निवडणुकीत रोजगार, व्यवसाय, ग्रामीण अर्थव्यवस्थेसह अनेक आघाड्यांवर भाजपच्या हाती निवडणुकीत अशी श्वेतपत्रिका असेल जिच्या आधारे भाजप पुन्हा एकदा मोदी मॅजिकला वापरण्याचा प्रयत्न करू शकतो.