Budget 2020: अर्थसंकल्पावर २.४१ तास भाषण करूनही अपुरेच
By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2020 04:29 AM2020-02-02T04:29:19+5:302020-02-02T04:29:29+5:30
निर्मला सीतारामन अस्वस्थ; रक्तातील साखर पातळी राखण्यास खावे लागले गोड
- नितीन अग्रवाल
नवी दिल्ली : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मोदी-२ सरकारचा पहिला अर्थसंकल्प शुक्रवारी लोकसभेत सादर केला व त्यांचे त्यावरील भाषण आतापर्यंतचे सगळ्यात प्रदीर्घ ठरले. अर्थसंकल्प तब्बल दोन तास ४१ मिनिटे सलग वाचून दाखविल्यावरही सीतारामन तो पूर्ण करू शकल्या नाहीत. शेवटी त्यांनी अर्थसंकल्पाच्या शेवटचा टप्पा लोकसभा अध्यक्षांकडे तो न वाचताच सभागृहात मांडला, असे मानले जावे, अशी विनंती केली.
सीतारामन यांना भाषणाच्या शेवटच्या टप्प्यात त्यांच्या गळ्याने साथ दिली नाही. त्यावेळी त्या आरोग्य कराचे वाचन करीत होत्या. सलग दोन तास ४१ मिनिटे उभे राहून अर्थसंकल्प वाचल्यामुळे सीतारामन यांचा रक्तदाब कमी झाला व त्यांच्या कपाळावर घामही आला. त्या अस्वस्थ झाल्या, तेव्हा केंद्रीय मंत्री हरसिमरत कौर यांनी त्यांच्याकडे पाण्याचा ग्लास दिला. रक्तातील साखरेची पातळी राखण्यासाठी त्यांना गोडही दिले गेले.
पाणी पिऊन सीतारामन यांनी भाषण सुरू ठेवण्याचा प्रयत्न केला, परंतु ते शक्य झाले नाही. त्यांच्या शेजारी बसलेले संरक्षणमंत्री राजनाथ सिंह त्यांंना खाली बसण्याचा सल्ला देताना दिसले. त्यांनी सभागृहाला फक्त दोन पानेच बाकी असल्याचे सांगितले. सीतारामन यांनी लोकसभा अध्यक्षांच्या परवानगीने ती पाने वाचली आहेत, असे समजून सभागृहात ठेवली.
सीतारामन यांनी इंग्रजीत केलेल्या भाषणात उर्दू, हिंदी, संस्कृत भाषेतील अवतरणेही वाचली आणि चाणक्य नीतीच्या सूत्रांचाही उल्लेख केला. देशाच्या दुसऱ्या पूर्णवेळ महिला अर्थमंत्री असलेल्या निर्मला सीतारामन यांनी आपला पहिला अर्थसंकल्प सादर करताना सलग दोन तास १७ मिनिटे भाषण केले. त्या आधी मोदी सरकार-एकमध्ये अर्थमंत्री असलेले अरुण जेटली यांनीही सलग दोन तास १० मिनिटे अर्थसंकल्पाचेभाषण केले होते.
काश्मिरी कवितेचे वाचन
साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित कवी पंडित दीनानाथ कौल नदीम यांनी काश्मिरीत लिहिलेली कविताही त्यांनी वाचून तिचा अनुवादही केला. त्या म्हणाल्या, ‘आमचा देश बहरतो तो शालिमार बागेसारखा, आमचा देश दाल सरोवरात फुललेल्या कमळाच्या फुलासारखा, नवयुवकांच्या उसळत्या रक्तासारखा माझा देश, तुमचा देश, माझा देश, जगात सगळ्यात प्रिय देश.’