Budget 2023: विकसित भारताच्या संकल्पाची पायाभरणी करणारा अर्थसंकल्प, पंतप्रधान मोदींचा विश्वास
By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2023 07:57 AM2023-02-02T07:57:45+5:302023-02-02T07:58:09+5:30
Budget 2023: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०२३-२४ च्या अर्थसंकल्पाचे ‘ऐतिहासिक’ असे वर्णन केले असून, विकसित भारताचा निर्धार पूर्णत्वास नेण्यासाठी आवश्यक असलेली मजबूत पायाभरणी हा अर्थसंकल्प करेल, असे प्रतिपादन केले आहे.
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०२३-२४ च्या अर्थसंकल्पाचे ‘ऐतिहासिक’ असे वर्णन केले असून, विकसित भारताचा निर्धार पूर्णत्वास नेण्यासाठी आवश्यक असलेली मजबूत पायाभरणी हा अर्थसंकल्प करेल, असे प्रतिपादन केले आहे.
संसदेत अर्थसंकल्प सादर केल्यानंतर जारी करण्यात आलेल्या एका व्हिडीओ संदेशात मोदी यांनी म्हटले आहे की, हा अर्थसंकल्प वंचितांना प्राधान्य देणारा आहे. हा अर्थसंकल्प आजचा महत्त्वाकांक्षी समाज, गाव, गरीब, शेतकरी, मध्यम वर्ग अशा सर्वांचे स्वप्न साकार करील. विकसित भारताच्या निर्मितीस गती देणारा अर्थसंकल्प सादर केल्याबद्दल वित्तमंत्री सीतारामन आणि त्यांच्या टीमचे अभिनंदन करतो.
अर्थसंकल्पातील विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजनेचा उल्लेख करून मोदी म्हणाले की, मेहनत व सृजन करणाऱ्या समुदायासाठी अर्थसंकल्पात पहिल्यांदाच अशी तरतूद केली आहे. त्यामुळे त्यांच्या जीवनात मोठा बदल घडेल.
जीवनशैली बदलणार
n मोदी यांनी म्हटले की, गावापासून शहरापर्यंतच्या सर्व महिलांच्या जीवनशैलीत बदल घडविण्यासाठी अनेक पावले उचलण्यात आली आहेत.
n महिलांच्या स्वयंसहायता समूहांसाठी अर्थसंकल्पात करण्यात आलेल्या विशेष तरतुदीमुळे त्यांना नवी दिशा मिळेल.
n मोदी यांनी म्हटले की, सरकारने सहकार क्षेत्रासाठी जगातील सर्वांत मोठी अन्नसाठा योजना बनविली आहे. शेतीबरोबरच दूध व मासळी उत्पादन वाढविण्यासाठी विशेष तरतूद केली आहे. यातून शेतकरी, पशुपालक, मच्छिमार यांना उत्पादनाचा अधिक चांगला परतावा मिळण्यास मदत होईल.