गंगाजमुनात स्थितीमागे बिल्डर लॉबी
By admin | Published: January 31, 2015 12:34 AM2015-01-31T00:34:38+5:302015-01-31T00:34:38+5:30
Next
>राम इंगोले यांचा आरोपनागपूर : गंगाजमुनात सध्याची परिस्थिती निर्माण करण्यामागे बिल्डर लॉबीची महत्त्वपूर्ण भूमिका असल्याचा आरोप ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते राम इंगोले यांनी केला आहे. पोलिसांना हाताशी धरुन अशी स्थिती विविध ठिकाणच्या वारांगनांच्या वस्तीत यापूर्वी अनेकदा झाल्याचेही त्यांनी म्हटले आहे.इंगोले गेल्या अनेक वर्षांपासून या क्षेत्रात कार्यरत आहेत. पोलिसांच्या कारवाईमुळे गंगाजमुनात निर्माण झालेल्या स्थितीवर मत व्यक्त करताना ते म्हणाले, वेश्याव्यवसाय वाईट आहे. त्याहूनही वाईट अल्पवयीन मुलींच्या लैंगिक शोषणाचा प्रकार आहे. त्याचे समर्थन कुणीच करणार नाही. मात्र, या वस्तीच्या नावाने ओरड करणाऱ्यांची नियत तपासण्याची गरज आहे, असेही इंगोले म्हणाले. नागपूर असो अथवा महाराष्ट्रातील अन्य कोणतेही शहर किंवा गुजरातमधील सूरत शहर, ज्या ज्या ठिकाणी वारांगनांच्या वस्तीविरोधात ओरड आणि कारवाई केली गेली. त्याचे स्वरूप वेगळे अन् उद्देश वेगळा असल्याचे वेळोवेळी उघड झाले आहे. दरवेळी वारांगनांना पळवून लावणारे वेगळे चित्र निर्माण करतात. वेगळा कांगावा करतात. त्यासाठी पोलिसांना हाताशी धरले जाते. वारांगनांना त्यांच्या वस्तीतून पळवून लावणारे वातावरण शांत झाल्यानंतर त्या ठिकाणी मोठ्या बिल्डींग, मॉल उभारतात. ठिकठिकाणी असे झाले आहे. त्यासाठी बिल्डर लॉबी सुनियोजितपणे काम करते. पोलिसांसकट अनेकांना त्यातून मोठा लाभ मिळतो. गंगाजमुनात वेश्याव्यवसाय बंद करण्यामागे असाच डाव आहे.वेश्यावस्ती हटविण्यासाठी अशी एकाएकी टोकाची भूमिका घेणे, समजण्यापलिकडचे आहे. अशा प्रकारे कुणाला विस्थापित करणेही योग्य नाही. १९८० मध्ये राऊत नामक पोलीस अधिकाऱ्याने अशीच भूमिका घेतली होती. त्यावेळी राऊत यांना आम्ही या वस्तीचे वास्तव अन् वारांगनांच्या परिस्थितीची जाणीव करून दिली. त्यांनीही अभ्यास केला अन् नंतर स्थिती सामान्य झाली. ही कारवाई निरपेक्ष असेल तर संबंधित अधिकाऱ्यांनी येथील वास्तव लक्षात घेऊन अभ्यासपूर्वक कारवाईचे नियोजन करायला हवे. पुनवर्सनाचे काय ?वारांगनांना येथून काढायचे असेल, ही वस्ती हटवायची असेल, तर आधी पुनर्वसन करायला हवे, असेही मत इंगोले यांनी मांडले. हा धंदा कुणीच आनंदाने करीत नाही, विवशताच त्यामागे असते, हेसुद्धा ध्यानात घेण्याची गरज त्यांनी विशद केली.---