कॉम्प्युटर बाबांच्या आश्रमावर बुलडोझर, कारवाईनंतर काँग्रेसचा संताप
By महेश गलांडे | Published: November 8, 2020 05:29 PM2020-11-08T17:29:10+5:302020-11-08T17:30:04+5:30
इंदौरच्या कॉम्प्युटर बाबांच्या आश्रमावरील कारवाईचा काँग्रेसने विरोध केला आहे. माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांनी भाजपावर आरोप करताना, सुडाच्या भावनेतूनच ही कारवाई करण्यात आल्याचं म्हटलंय
इंदौर - मध्य प्रदेशच्याइंदौर येथे प्रशासनाकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. भाजपातून नुकतेच काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले कॉम्प्युटर बाबा यांच्याविरुद्ध शिवराजसिंह चौहान सरकारने ही कारवाई केली आहे. कॉम्प्युटर बाबांनी इंदौरच्या काही भागात केलेल्या अतिक्रमणावर प्रशासनाने बुलडोझर फिरवला आहे. तसेच, कॉम्प्युटर बाबांसह 7 जणांना अटकही करण्यात आली आहे.
इंदौरच्या कॉम्प्युटर बाबांच्या आश्रमावरील कारवाईचा काँग्रेसने विरोध केला आहे. माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांनी भाजपावर आरोप करताना, सुडाच्या भावनेतूनच ही कारवाई करण्यात आल्याचं म्हटलंय. दिग्विजयसिंह यांनी यासंदर्भात ट्विट केलं आहे. त्यामध्ये, इंदौरमधील कॉम्प्युटर बाबांचा आश्रम आणि मंदीर हे सुडाच्या भावनेतूनच पाडण्यात आले आहे. या कारवाईपूर्वीही कुठलिही नोटीस देण्यात आली नाही. भाजपाने राजकीय भावनेतून सूड घेण्याची सीमा पार केली असून मी या घटनेचा निषेध व्यक्त करतो, असे सिंह यांनी म्हटले आहे.
#WATCH Madhya Pradesh: District Administration today demolished an illegal construction belonging to Computer Baba in Indore.
— ANI (@ANI) November 8, 2020
"Six people have been detained as they tried to obstruct demolition process," says Additional District Magistrate (ADM), Indore pic.twitter.com/iX7ggDRk0k
माजी मंत्री आणि मध्य प्रदेशातील पोटनिवडणुकांपूर्वी लोकशाही वाचवा म्हणत 28 विधानसभा क्षेत्रात रॅली काढणाऱ्या कॉम्प्युटर बाबांच्या इंदौरमधील गोमटगिरीस्थित आश्रमावर कारवाई करण्यात आली. शहरातील ग्राम जमुंडी हाप्सी येथील तब्बल 46 एकर जमिनीवर हा आश्रम आणि विश्रामगृह बनिवण्यात आलं आहे. प्रशासनाच्या मते, या जमीनीवरील एका मोठ्या भूभागावर कॉम्प्युटर बाबांनी कब्जा केला आहे. तसेच, या जागेवर बांधकामही करुन आश्रम उभारलं आहे. त्यामुळे, आज सकाळी 100 पेक्षा अधिक वाहन आणि पोलीस फौजफाटा घेऊन प्रशासनाने या जागेवर कारवाई केली आहे.
दरम्यान, या कारवाईला विरोध करत कॉम्प्युटर बाबांसह अनेकांनी कारवाई थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी बाबांसह 7 जणांना अटक केली आहे.