नवी दिल्ली : दिल्लीच्याबुरारीमधील एका घरात रविवारी 11 मृतदेह आढळून आले. यामुळे संपूर्ण दिल्लीत एकच खळबळ माजली आहे. एका स्वयंघोषित बाबाच्या आहारी जाऊन एकाच कुटुंबातील 11 जणांनी जीवनयात्रा संपवली असावी, अशी शक्यता पोलिसांच्या प्राथमिक तपासातून पुढे आली होती. मात्र आता कुटुंबातील सर्वात तरुण मुलगा असलेला ललितच या आत्महत्यांना जबाबदार असल्याची माहिती पोलीस तपासातून समोर आली आहे. दिल्लीतील एकाच कुटुंबातील 11 जणांच्या आत्महत्येमागे कोणत्याही बाबाचा हात असल्याचे पुरावे पोलिसांना मिळालेले नाहीत. कर्मकांड आणि सामूहिक आत्महत्येसाठी कोणीतरी ललितला भरीस पाडलं असावं, असा संशय सुरुवातीला पोलिसांना होता. मात्र आता त्यांचा संशय दूर झाला आहे. ललित एखाद्या गंभीर मानसिक रोगानं ग्रस्त होता, अशी शक्यता पोलिसांना वाटत आहे. ही शक्यता पोलीस पडताळून पाहत आहेत. मात्र ललितची मानसिक स्थिती योग्य होती, असा त्याच्या नातेवाईकांचा दावा आहे. दहा वर्षांपूर्वी मृत झालेले वडील आपल्याला दिसतात, आपण त्यांच्याशी सल्लामसलत करतो, असा ललितचा दावा होता. अनेक व्यवहार करताना, प्रॉपर्टीची खरेदी-विक्री करताना ललित मृत वडिलांचा सल्ला घ्यायचा, अशी माहिती प्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांनी दिली. ललितकडे विशेष शक्ती आहेत, असा त्याच्या कुटुंबाचा समज होता. त्यामुळे त्यांचा ललितवर पूर्ण विश्वास होता. 'ललित त्याच्या मृत वडिलांशी संवाद साधून अनेक गोष्टींची नोंद रजिस्टरमध्ये करायचा. मोक्षप्राप्तीसाठी काय करायचा, याच्या सूचना रजिस्टरमध्ये आहेत. याच सूचनांप्रमाणे घरातील सर्वांनी त्यांचं जीवन संपवलं,' अशी माहिती पोलिसांनी दिली.
Burari Deaths : बाबा नव्हे, 'त्या' 11 आत्महत्यांना मुलगाच जबाबदार; पोलिसांना संशय
By ऑनलाइन लोकमत | Published: July 03, 2018 1:28 PM