बंगळुरू - सध्या पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकांमुळे देशातील राजकीय पारा चढलेला आहे. तर कर्नाटकमध्येही तीन लोकसभा आणि दोन विधानसभा मतदारसंघात होऊ घातलेल्या पोटनिवडणुकीमुळे राजकीय वातावरण तापलेले आहे. शिमोगा, बेल्लारी आणि मांड्या या लोकसभा तर रमणग्राम आणि जामखंडी या विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक रंगणार आहे. या पोटनिवडणुकीत शिमोगा लोकसभा मतदारसंघातील लढत रंगतदार ठरणार आहे. कारण या मतदार संघामध्ये तीन माजी मुख्यमंत्र्याचे पुत्र आमने-सामने आले आहेत. बी. एस. येडियुरप्पा यांनी राजीनामा दिल्याने शिमोगा लोकसभा मतदारसंघातील जागा रिक्त झाली आहे. येथील पोटनिवडणुकीसाठी भाजपाने येडियुरप्पा यांचे पुत्र बी. राघवेंद्र यांना मैदानात उतरवले आहे. तर काँग्रेस आणि जेडी (एस) आघाडीकडून माजी मुख्यमंत्री एस. बांगरप्पा यांचे पुत्र मधु बांगरप्पा यांना तिकीट देण्यात आले आहे. या दोघांमध्येच मुख्य लढत होण्याची शक्यता आहे. मात्र कर्नाटकचे अजून एक माजी मुख्यमंत्री जे. एच. पटेल यांचे पुत्रा महिमा पटेल यांना जनता दल (यू) पक्षाने उमेदवारी दिल्याने येथील निवडणूक तिरंगी झाली आहे. दरम्यान, तीन लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीपैकी शिमोगा आणि बेल्लारी मतदारसंघातील निवडणूक भाजपासाठी प्रतिष्ठेची आहे. तर मांड्या मतदारसंघातमध्ये जनता दल (एस) पक्षाची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. या पोटनिवडणुकीकडे पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीपूर्वी कर्नाटकमधील भाजपा आणि काँग्रेस-जेडी (एस) आघाडी यांच्यातील सेमीफायनल म्हणून पाहिजे जात आहे. यापैकी शिमोगा आणि बेल्लारी मतदारसंघात विजय मिळवल्यास भाजपासाठी कर्नाटकमध्ये लोकसभा निवडणुकीची वाट सोपी होणार आहे. तर पराभव झाल्यास भाजपाच्या अडचणीत अजून वाढ होईल.
कर्नाटकमधील पोटनिवडणुकीत तीन माजी मुख्यमंत्र्यांचे पुत्र आमने-सामने
By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2018 2:35 PM