लखनऊ: सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात आंदोलन करताना अटक करण्यात आल्यानंतर पोलिसांनी चौकशीदरम्यान गैरवर्तन केल्याचा आरोप एका सामाजिक कार्यकर्त्यानं केला आहे. तू हिंदू आहेस. मग मुस्लिमांसोबत तुझी मैत्री कशी, अशा प्रकारचे प्रश्न पोलिसांनी चौकशीदरम्यान विचारल्याचा आरोप रॉबिन वर्मा यांनी केला. सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात आंदोलन करत असताना वर्मांना २० डिसेंबर रोजी अटक झाली. त्यांना गेल्याच आठवड्यात जामीन मंजूर झाला. पेशानं शिक्षक असलेले रॉबिन वर्मा सामाजिक कार्यकर्तेदेखील आहेत. पोलिसांनी चौकशीदरम्यान अतिशय आक्षेपार्ह प्रश्न विचारल्याचे आरोप वर्मांनी केले. पोलिसांनी शारीरिक अत्याचार केल्याचा आरोप वर्मांनी 'द हिंदू' दैनिकाशी बोलताना केला. याशिवाय आपल्या पत्नी आणि लहान मुलीबद्दल अतिशय अश्लाघ्य भाषा वापरल्याचा दावाही वर्मांनी केला. पोलिसांनी माझा फोन तपासला. अजूनही तो त्यांच्याच ताब्यात आहे. पोलिसांनी माझ्या फोनमधील कॉन्टॅक्ट नंबर पाहिले आणि त्यातील मुस्लिम व्यक्तींच्या नावांवरुन मला अपमानित केलं, असं वर्मा यांनी सांगितलं. 'माझ्या एका (मुस्लिम) विद्यार्थ्यानं मला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. त्यांनी त्या विद्यार्थ्याचा मेसेज पाहून तू त्याला कसा ओळखतोस? तुझ्या मोबाईलमध्ये मुस्लिम व्यक्तींचे नंबर कसे काय? तू त्यांच्याशी मैत्री कशी ठेवतोस? तू त्यांच्यासोबत का जातोस?' असा प्रश्नांचा भडिमार पोलिसांनी केल्याचा आरोप वर्मांनी केला. पोलिसांनी पत्नी आणि लहान मुलीबद्दल अतिशय वाईट शब्दांत शेरेबाजी केल्याचा दावादेखील त्यांनी केला. 'तिला कुठेतरी नेऊन बसवू. तिला धंदा करायला लावू,' असं पोलीस चौकशीदरम्यान म्हणाले. माझ्या दोन वर्षांच्या मुलीबद्दलही पोलिसांनी हीच भाषा वापरली. माझं आणि माझ्या कुटुंबाचं आयुष्य उद्ध्वस्त करण्याची धमकी पोलिसांनी दिली, असं वर्मा यांनी सांगितलं.
CAA Protest : तू हिंदू आहेस ना? मग तुझे मित्र मुस्लिम कसे?; पोलिसांचा आंदोलनकर्त्याला सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2020 3:55 PM