नवी दिल्ली : उत्तर प्रदेशमध्ये पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकासाठी (UP Assembly Election) राजकीय पक्षांची जोरात सुरू आहेत. उत्तर प्रदेशात सत्तेत असलेली भाजपा 'मिशन २०२२' साठी सतत मंथन करीत आहे, तर समाजवादी पक्षही विजयाच्या रणनीतीअंतर्गत युती करण्याचा प्रयत्न करीत आहे. याचबरोबर, बसपा सुप्रिमो मायावती यांनी स्वबळावर निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. याच पार्श्वभूमीवर बसपाने ब्राह्मण अधिवेशन घेण्याची घोषणा केली आहे. यावरून भाजपाचे नेते आणि केंद्रीय मंत्री अश्विनी चौबे यांनी मंगळवारी मायावती यांच्यावर निशाणा साधला.
ब्राह्मण समाज भाजपाला पाठिंबा देईल, कारण ते भारतीय संस्कृती आणि राष्ट्रीय हितासाठी काम करीत आहेत, असे अश्विनी चौबे म्हणाले. दिल्लीत संसदेच्या आवारात केंद्रीय मंत्री अश्विनी चौबे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ब्राह्मण जात नसून एक संस्कृती आहे. त्यांनी नेहमीच भारतीय संस्कृती आणि राष्ट्रीय हिताला चालना देण्यासाठी काम केले आणि ते ज्या पक्षाच्या बाजूने आहेत, त्यांच्या पाठीशी उभे राहतील, असे अश्विनी चौबे म्हणाले. तसेच, त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची तुलना मौर्य राजघराण्यातील राजा चंद्रगुप्त मौर्य यांच्यासोबत केली आहे. ते म्हणाले की, चाणक्य चंद्रगुप्त मौर्य यांच्याप्रमाणेच ब्राह्मण मोदींचे समर्थन करेल.
उत्तर प्रदेशात 11 टक्के ब्राह्मण अश्विनी चौबे यांच्यासह भाजपामधील काही ब्राह्मण नेत्यांची अलीकडेच बैठक घेतली होती. यामध्ये त्यांनी समाजाला पार्टीसोबत राहण्यासाठी विविध पद्धतीने मंथन केले होते. उत्तर प्रदेशात लोकसंख्येच्या अंदाजे 11 टक्के ब्राह्मण लोक आहेत आणि हा समुदाय पारंपारिकपणे भाजपाला पाठिंबा देतो. मात्र, निवडणुका होण्यापूर्वी विरोधी पक्षांनी भाजपाच्या व्होट बँकला सुरुंग लावण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.
बसपाकडून ब्राह्मण अधिवेशन घेण्याची घोषणाबहुजन समाजवादी पार्टीने अनेक ब्राह्मण अधिवेशने घेण्याची घोषणा केली आहे. या अधिवेशनाची सुरूवात 23 जुलैपासून अयोध्यापासून होणार आहे. समाजवादी पार्टी आणि काँग्रेसनेही या ब्राह्मण समुदायाला आपल्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच, राज्यातील योगी आदित्यनाथ सरकार त्यांच्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप केला आहे. दरम्यान, बसपावर निशाणा साधत अश्विनी चौबे यांनी असा आरोप केला आहे की, यापूर्वी पक्षातील नेत्यांनी ब्राह्मणांचा 'अपमान' केला होता आणि आता ते या समाजाला आकर्षित करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. ते भगवान परशुराम यांचा पुतळा बसविण्याचे आणि त्यांच्या नावावर विद्यापीठ स्थापन करण्याचे काम करत असल्याचेही अश्विनी चौबे म्हणाले.
ब्राह्मण समाज सर्वात दु:खी - मायावतीबसपाच्या सुप्रीमो आणि माजी मुख्यमंत्री मायावती यांनी उत्तर प्रदेशमधील आगामी विधानसभा निवडणुकांसाठी निवडणूक मंडळाची स्थापना केली आहे. ब्राह्मण मतदारांबद्दल त्यांचे प्रेम वाढले आहे. रविवारी मॉल एव्हेन्यू येथील पार्टी कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत मायावतींनी सत्ताधारी भाजपावर जोरदार हल्लाबोल केला. त्या म्हणाल्या की, भाजपा सरकारच्या वाईट धोरणांमुळे जनतेची परिस्थिती त्रस्त आहे. समाजातील सर्व घटकांतील लोकांचे शोषण होत आहे. विशेषत: या सरकारमध्ये ब्राह्मण समाज सर्वात दु:खी आहे. गेल्या निवडणुकीत ब्राह्मण समाजातील लोकांनी एकहाती मते देऊन भाजपाचे सरकार स्थापन केले होते, पण आता हे लोक त्यांच्यावर विश्वास ठेवणार नाहीत. मला आशा आहे की ब्राह्मण समाजातील लोक यावेळी बसपामध्ये सामील होऊन सर्वसमाजांचे सरकार स्थापन करतील, असे मायावती म्हणाल्या.