नवी दिल्ली, दि. 1 - केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार येत्या रविवारी म्हणजेच 3 सप्टेंबरला होणार असल्याचं जवळपास निश्चित झालं आहे. वृत्तसंस्था पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार रविवारी सकाळी 10 वाजता केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. मंत्रिमंडळाच्या विस्तारापुर्वीच केंद्रीय कौशल्य विकास मंत्री आणि भाजपाचे बिहारचे नेते राजीव प्रताप रूडी, गंगा शुद्धीकरण खात्याच्या मंत्री उमा भारती सेच आरोग्य राज्यमंत्री फागनसिंह कुलस्ते यांनी राजीनामा दिल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. तसेच संजीव बलियान, कलराज मिश्रा, महेंद्र पंड्या या मंत्र्यांनीही राजीनामा दिल्याचे कळते. सूत्रांनुसार, मंत्रिमंडळ फेरबदल आणि विस्तारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्यात चर्चा झाल्याचेही कळते. त्यानुसार अनेक मंत्री अमित शहा यांना भेटले.
नितीश कुमार यांच्या जदयूच्या नेत्यांचा समावेश मंत्रिमंडळात होणार आहे. तसेच अण्णा द्रमुकला मंत्रिमंडळात स्थान दिले जाणार आहे. मात्र अण्णा द्रमुकने यासाठी काहीसा वेळ मागितला असून, त्यामुळे सध्या केवळ मंत्रिमंडळ फेरबदल केला जाऊ शकतो. पंतप्रधान मोदी चीन दौºयावरून परतल्यानंतर मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे.
अर्थमंत्री अरुण जेटली यांनी संरक्षणमंत्रीपदाची जबाबदारी फार दिवस राहणार नसल्याचे केलेले विधान व भाजपाचे अध्यक्ष अमित शाह यांच्या भेटीसाठी मंत्र्यांची झालेली गर्दी यामुळे मंत्रिमंडळात फेरबदलाची चर्चा सुरू झाली. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे रेल्वे खाते येऊ शकते.
कलराज मिश्रा यांनीही शाह यांची भेट घेतली. त्यांनी वयाची 75 वर्षे पूर्ण केली असल्यामुळे त्यांच्या मंत्रीपदाबाबत प्रश्नचिन्ह आहे. त्यांना राज्यपाल म्हणून पाठवले जाईल, असे कळते. राज्यपालपदाच्या आठ जागा रिक्त असून, लालजी टंडन, विजयकुमार मल्होत्रा व सी. पी. ठाकूर यांना राज्यपाल केले जाऊ शकेल.
पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तर प्रदेश आणि बिहारमधील काही राज्यमंत्र्यांना जबाबदारीतून मोकळे करू इच्छितात. उमा भारती, राधा मोहन सिंह यांनी मोदी यांना निराश केल्यामुळे मंत्रालयांची फेररचना होऊ शकेल. गडकरी यांच्याकडे रेल्वे मंत्रालयाची जबाबदारी जाणार हे जवळपास निश्चित आहे. सुरेश प्रभू यांना कायम ठेवून गंगा शुद्धीकरण आणि वस्त्रोद्योग मंत्रालयाची जबाबदारी दिली जाऊ शकते. संरक्षण खात्याची जबाबदारी कोणाकडे येईल हे स्पष्ट नाही. पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचे नाव त्यासाठी घेतले जात आहे. भाजपा सरचिटणीस भूपेंद्र यादव यांची मंत्रिमंडळात वर्णी लागेल, असे बोलले जात आहे. मंत्रिमंडळाच्या फेररचनेचा फटका दोन डझन मंत्र्यांना बसण्याची शक्यता आहे.