नवी दिल्ली: देशभरातील एम्स रुग्णालयांची उभारणी अतिशय संथ गतीनं सुरू असल्याचं कॅगनं अहवालात म्हटलं आहे. एम्स रुग्णालयांची उभारणी कासव गतीनं सुरू असल्यानं त्यांच्या निर्मितीचा खर्च 3 हजार कोटी रुपयांनी वाढला आहे, असंदेखील कॅगनं अहवालात नमूद केलं आहे. त्यामुळे मोदी सरकारच्या 'गतीमान' कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. पंतप्रधान आरोग्य सुरक्षा योजनेअंतर्गत एम्स रुग्णालयांची उभारणी केली जाते. मात्र या योजनेअंतर्गत घोषणा करण्यात आलेल्या एम्स रुग्णालयांची बांधकामं अत्यंत संथ गतीनं सुरू आहे. सरकारच्या कारभारातील याच त्रुटींवर कॅगनं प्रकाश टाकला आहे. पंतप्रधान आरोग्य सुरक्षा योजनेअंतर्गत येणाऱ्या अनेक प्रकल्पांचं काम अतिशय संथ गतीनं सुरू असल्याचं कॅगनं म्हटलं आहे. याला प्रशासकीय उदासीनता, देखरेख करणाऱ्या यंत्रणेचा ढिसाळ कारभार कारणीभूत असल्याचं कॅगनं अहवालात नमूद केलं आहे. पंतप्रधान आरोग्य सुरक्षा योजनेअंतर्गत पुढील 15 वर्षांमध्ये देशभरात एम्ससारख्या संस्था स्थापन केल्या जाणार आहेत. याच योजनेअंतर्गत सध्या सुरू असलेली वैद्यकीय महाविद्यालयं आणि संस्था यांचंही आधुनिकीकरण करण्यात येणार आहे. मात्र हे काम अतिशय संथपणे सुरू असल्याचे ताशेरे कॅगनं ओढले आहेत. एम्स रुग्णालयांच्या उभारणीचं काम निर्धारित वेळेपेक्षा चार ते सहा वर्ष उशिरानं होत असल्याचं कॅगनं अहवालात म्हटलं आहे. 2016-17 मध्ये सहा नवी एम्स रुग्णालयं सुरू करण्यासाठी सरकारनं 14,970 रुपयांचा निधी मंजूर केला. मात्र हा निधी उशिरानं संबंधित विभागांना पोहोचला. त्यामुळे झालेल्या विलंबामुळे रुग्णालयांच्या उभारणीचा खर्च 2,928 कोटी रुपयांनी वाढला आहे.
एम्स रुग्णालयांची उभारणी कासव गतीनं; तीन हजार कोटींचं नुकसान
By ऑनलाइन लोकमत | Published: August 08, 2018 1:10 PM