डेहराडून : उत्तराखंडमध्ये मुसळधार पाऊस व पुराने ‘चारधाम’ यात्रेकरू अडकून पडले असून, त्यांना सुरक्षितस्थळी पोहोचविण्यासाठी सहा हेलिकॉप्टर्सची मदत घेतली जात आहे. दरम्यान, ‘चारधाम’ यात्रा काही काळ स्थगित करण्यात आली आहे.रुद्रप्रयाग आणि चमोली जिल्ह्णातील किमान सहा रस्ते वाहून गेल्यामुळे बद्रीनाथ, हेमकुंड साहिब, केदारनाथ, गोविंद घाट, घांघरिया आदी ठिकाणी हजारो भाविक अडकून पडले आहेत. गोविंद घाटाजवळील पूल वाहून गेल्याने बद्रीनाथ राष्ट्रीय महामार्ग बंद आहे.केदारनाथ, हेमकुंड साहिब व बद्रीनाथ भागातून ९०० यात्रेकरूंना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. मुसळधार पाऊस सुरूच असल्याने दुसऱ्या दिवशीही चारधाम यात्रा विस्कळीत राहिली.सध्या केदारनाथला एकही यात्रेकरू नसून त्यांना सोनप्रयाग येथे आणण्यात आले आहे. वातावरण अनुकूल झाल्यानंतर ते पुढील प्रवास सुरू करतील, असे अतिरिक्त मुख्य सचिव राकेश शर्मा यांनी डेहराडून येथे सांगितले. (वृत्तसंस्था)
मुसळधार पावसाने ‘चारधाम’ यात्रा स्थगित
By admin | Published: June 26, 2015 11:46 PM