लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : विमान उड्डाणादरम्यान मुख्य वैमानिकाला सर अशी हाक देण्याऐवजी कॅप्टन अथवा त्याच्या प्रथम नावाने संबोधित करावे, अशी सूचना एअर इंडिया एक्स्प्रेसने सर्व केबिन क्रू मेंबर्सना केली आहे. कॉकपिट रिसोर्स मॅनेजमेंटमध्ये सुधारणा करण्यासाठी हे बदल हाती घेतल्याचे सांगण्यात आले.
यासंबंधातील आदेश नुकतेच जारी केले. २०१८ मध्ये त्रिची येथे घडलेल्या विमान दुर्घटनेचा उल्लेख त्यात करण्यात आला आहे. या दुर्घटनेत एअर इंडिया एक्स्प्रेसचे विमान उड्डाणा दरम्यान पाठीमागील बाजूला आदळले होते. त्यानंतर विमानतळाच्या संरक्षक भिंतीना ठोकर बसली होती. विमान दुर्घटनेचा तपास करणाऱ्या यंत्रणांकडून त्यासंबंधीचा अहवाल गेल्या महिन्यात जारी करण्यात आला. त्यानुसार, ट्रिगर टेक-ऑफ रोल करताना मुख्य वैमानिकाच्या आसनावर अनपेक्षितपणे दाब निर्माण झाला. त्यामुळे त्याच्याकडून अनावधानाने थ्रस्ट लीव्हर मागे खेचला गेल्याने इंजिनाची शक्ती कमी झाली. दोन्ही वैमानिकांतील विसंवादामुळे ही दुर्घटना घडल्याचे अहवालात म्हटले आहे.
भविष्यात असे प्रकार रोखण्यासाठी कॉकपिट रिसोर्स मॅनेजमेंटमध्ये सुधारणा करण्याचे प्रस्तावित आहे. प्रत्येक केबिन क्रू मेंबरने मुख्य पायलटला त्याच्या पहिल्या नावाने किंवा कॅप्टन असे संबोधित करणे, कॉकपिटमधील औपचारिक वातावरण कमी करण्यासाठी पावले उचलणे आदी बदल त्यात समाविष्ट आहेत, असे एअर इंडिया एक्स्प्रेसने म्हटले आहे.
बदल स्वीकारण्यास वेळ लागेलविमानाचा मुख्य वैमानिक हा २५ ते ३० वर्षांहून अधिक अनुभवी असतो. बऱ्याचदा हवाई दलातील निवृत्त वैमानिकांचा त्यात समावेश असतो. अशावेळी २५ वर्षीय सहवैमानिक त्याला नावाने हाक मारू लागला, तर केबिनमधील वातावरण सुधारण्याऐवजी आणखी बिघडेल. त्यामुळे कॅप्टन म्हणणेच उचित राहील. मात्र, हे बदल स्वीकारण्यास खूप वेळ लागू शकतो, असे हवाई वाहतूक तज्ज्ञांनी सांगितले.