Cambridge Analytica Scandal : FB डेटा लीकप्रकरणी इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाची केम्ब्रिज अॅनालिटिकाला नोटीस
By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2018 09:47 AM2018-03-24T09:47:46+5:302018-03-24T10:40:29+5:30
अमेरिकेसह अनेक देशांच्या निवडणुकांमध्ये 5 कोटी फेसबुक सदस्यांचा डेटा चोरून मतदारांवर प्रभाव पाडण्याचा आरोप असणाऱ्या केम्ब्रिज अॅनालिटिका कंपनीवरुन आता भारतीय राजकारणात खडाजंगी सुरू झाली आहे.
नवी दिल्ली - अमेरिकेसह अनेक देशांच्या निवडणुकांमध्ये 5 कोटी फेसबुक सदस्यांचा डेटा चोरून मतदारांवर प्रभाव पाडण्याचा आरोप असणाऱ्या केम्ब्रिज अॅनालिटिका कंपनीवरुन आता भारतीय राजकारणात खडाजंगी सुरू झाली आहे. फेसबुकवरील डेटाचोरीच्या प्रकरणाने अमेरिका, इंग्लंड आणि भारतात रान उठवले असतानाच आणि त्याबद्दल फेसबुकचा सीईओ मार्क झुकेरबर्ग याने माफीही मागितली आहे. दरम्यान, याप्रकरणी इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालयानं याप्रकरणी केम्ब्रिज अॅनालिटिका कंपनीला नोटीस बजावली आहे. या नोटीसद्वारे 31 मार्चपर्यंत 6 प्रश्नांची उत्तर द्यायला सांगितले आहे. अन्यथा कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल, अशा इशारादेखील माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने केम्ब्रिज अॅनालिटिकाला दिला आहे.
भारतीयांच्या माहितीचा वापर करण्यामध्ये कंपनीचा स्वतःचा सहभाग आहे का?,कंपनीच्या माध्यमातून भारतीयांची माहिती मिळवणाऱ्या दुसऱ्या कंपन्या कोणत्या आहेत?, भारतीयांची माहिती त्यांनी कशा प्रकारे मिळवली?, माहिती मिळवण्यापूर्वी संबंधित व्यक्तीची परवानगी घेतली होती का?, या माहितीपर्यंत कंपनी कशी पोहोचली?, या मिळवलेल्या माहितीच्या आधारे काही नवी प्रोफाईल्स तयार करण्यात आली आहेत का? यांसारख्या प्रश्नांचा नोटीसमध्ये समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. 23 मार्च 2018 ला केंद्र सरकारने केम्ब्रिज अनॅलिटिकाला ही नोटीस पाठवली आहे.
Ministry of Electronics & Information Technology issued notice to #CambridgeAnalytica, asking them to reply to 6 questions by 31 March. Questions include how they collected user data, how it was used & if consent was taken for the same.
— ANI (@ANI) March 24, 2018
धक्कादायक ! फेसबुक लॉग इनची माहिती विकली जाते फक्त ३४० रुपयांत
दुसरीकडे, आपल्यासाठी अमूल्य असणारे फेसबुकवरील लॉग इनचे डिटेल्स केवळ ३४० रुपयांना विकले जात असल्याचे एका कंपनीने निदर्शनास आणले आहे. अमेरिकेतील निवडणुकीसाठी ५ कोटी फेसबुक युजर्सचे लॉग इन डिटेल्स चोरण्यात आले होते. ही माहिती जर वरील किमतीला विकली असेल तर त्याचे मूल्य जवळपास १७०० कोटी रुपये एवढे आहे. फेसबुकसोबत आपण जे अॅप अटॅच करतो, एखाद्या फोटोशी तुलना करण्यासाठी, स्वभावाविषयी जाणून घेऊन ते पोस्ट करण्यासाठी आपण जिथे लॉग इन करतो, अशा अॅपच्या माध्यमातून ही डेटाचोरी होऊ लागली आहे. बिटनमधील रिसर्च कंपनी केम्ब्रिज अॅनालिटिका या कंपनीने डेटाचोरी केल्याचे प्रकरण समोर आले आहे. अशा असंख्य कंपन्यांनी आतापर्यंत फेसबुकवरून डेटा चोरला आहे. डार्क वेब मार्केटमध्ये जिथे कोणतेच वैध व्यवहार होत नाहीत, तिथे तुमचा हा डेटा जाहिरातदारांना, रिसर्च कंपन्यांना विकला जातो. ड्रीम, पॉइंट आणि वॉल स्ट्रीट मार्केट अशा तीन डार्क वेब मार्केटचा अभ्यास एका कंपनीने केला आहे.
म्हणून झुकेरबर्गची मान झुकली!
सोशल मीडियाच्या जगात अग्रगण्य आणि नावाजलेली असलेल्या फेसबुकवर डेटाचोरीच्या प्रकरणामुळे मात्र नामुष्कीची वेळ आली. कर्मचाऱ्यांच्या चुकीमुळे मार्क झुकेरबर्गला माफी मागावी लागली. भारतासारख्या देशातील आगामी निवडणुका निष्पक्ष होण्यासाठी फेसबुक आपल्या सुरक्षा सुविधेत वाढ करणार असल्याचे त्याला सांगावे लागले आहे.
जी-मेलचा डेटा मिळतो स्वस्त
या कंपनीने दावा केला की जी-मेल, उबेर व ग्रुबहबच्या सेवांवर असलेली तुमची माहितीही फेसबुकपेक्षा स्वस्तात उपलब्ध आहे. एखाद्या कंपनीने घासाघीस केल्यास, तुमचा जी-मेल आयडी आणि पासवर्ड केवळ ६५ रुपयांत विकला जातो. उबरवरील तुमची माहिती ४५५ रुपये तर ग्रुबहबवरील माहिती ५८५ रुपयांना विकली जाते.