राज्य पोलीस केंद्रीय तपास यंत्रणेतील अधिकाऱ्यांना अटक करू शकतं का?; सुप्रीम कोर्ट म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2024 12:44 PM2024-11-30T12:44:19+5:302024-11-30T12:44:58+5:30

या प्रकरणाच्या तपासात आरोपीची कोणतीही भूमिका असू शकत नाही. मात्र त्यांना निष्पक्ष तपास करण्याचा अधिकार आहे असं खंडपीठाने म्हटले आहे.

Can the state police arrest officers of the Central Investigation Agency?; The Supreme Court said... | राज्य पोलीस केंद्रीय तपास यंत्रणेतील अधिकाऱ्यांना अटक करू शकतं का?; सुप्रीम कोर्ट म्हणाले...

राज्य पोलीस केंद्रीय तपास यंत्रणेतील अधिकाऱ्यांना अटक करू शकतं का?; सुप्रीम कोर्ट म्हणाले...

नवी दिल्ली - राज्य सरकारकडून केंद्रीय तपास यंत्रणांच्या अधिकाऱ्यांना अटकेच्या घटनांमधील वाढ पाहता सुप्रीम कोर्टाने महत्त्वाची टिप्पणी केली आहे. कोर्टाने केंद्रीय अधिकाऱ्यांना सूडाच्या कारवाईपासून संरक्षण करण्याच्या स्पर्धात्मक उद्दिष्टांमध्ये संतुलन साधण्यावर भर देण्यात आला. अशा कारवाईमुळे घटनात्मक संकट निर्माण होऊ शकते असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. राज्य सरकारच्या पोलिसांना भ्रष्टाचाराच्या आरोपांची चौकशी करण्यापासून रोखता येणार नाही असंही न्यायालयाने म्हटले आहे.

ईडी अधिकाऱ्याच्या अटकेचं प्रकरण

तामिळनाडू पोलिसांनी कथित भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली ईडीच्या एका अधिकाऱ्याला अटक केल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या खंडपीठाने सांगितले की, अधिकारी केंद्र सरकारचे आहेत का, त्यांना राज्य पोलिसांनी अटक करावी का, हा प्रश्न आहे. त्या अधिकाऱ्याविरुद्ध कारवाई करण्यास केंद्र सरकारने परवानगी दिली असती तर परिस्थिती पूर्णपणे वेगळी असती असं कोर्टाने म्हटलं.

तामिळनाडूचे अतिरिक्त महाधिवक्ता अमित आनंद तिवारी यांनी कोर्टाला सांगितले की, ईडीच्या अधिकाऱ्याला २० लाख रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले. लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यांतर्गत या प्रकरणाचा तपास जवळपास पूर्ण झाला आहे. राज्य पोलीस आरोपपत्र दाखल करण्यास तयार आहेत, परंतु ईडी सर्वोच्च न्यायालयात जात असल्याने प्रतीक्षा करावी लागली तर आरोपी अधिकाऱ्याच्या वकिलाने हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला तेव्हा तिवारी यांनी आक्षेप घेतला आणि गुन्ह्याचा तपास कोणत्या एजन्सीने करायचा हा तपासाचा विषय असल्याचं सांगितले. या प्रकरणाच्या तपासात आरोपीची कोणतीही भूमिका असू शकत नाही. मात्र त्यांना निष्पक्ष तपास करण्याचा अधिकार आहे असं खंडपीठाने म्हटले आहे.

...तर घटनात्मक संकट निर्माण होईल

या खटल्यातील विरोधाभासी मुद्द्यांचा संदर्भ देत खंडपीठाने म्हटलं की, संघराज्य रचनेत प्रत्येक घटकाला त्याच्या अधिकारक्षेत्राचे विशेष डोमेन राखून ठेवण्याची परवानगी दिली पाहिजे. एक काल्पनिक उदाहरण घ्या - जर एखाद्या राज्याच्या पोलिसांनी सूडबुद्धीने केंद्र सरकारच्या अधिकाऱ्यांना अटक केली तर ते घटनात्मक संकट निर्माण करेल. त्यामुळे राज्याला केंद्रीय अधिकाऱ्यांना अटक करण्याचा अधिकार असणे हे संघीय रचनेसाठी घातक ठरेल. परंतु राज्य पोलिसांना त्यांच्या अधिकारक्षेत्रात घडलेल्या गुन्ह्याचा तपास करण्याच्या अधिकारापासून वंचित ठेवणे अनिष्ट ठरेल. पोलीस शक्तीच्या या दोन प्रतिस्पर्धी पैलूंमध्ये संतुलन साधण्यासाठी आम्ही दोन्ही बाजूंच्या युक्तिवादांवर चर्चा करू असं कोर्टाने म्हटलं.

दरम्यान, हे प्रकरण राज्य विरुद्ध केंद्र असं असल्याने आम्ही सर्वसमावेशक फेडरल फ्रेमवर्कचे नियोजन करण्याचा विचार करू आणि अशा प्रकरणांमध्ये तपासासाठी नियमावली तयार करू असं खंडपीठाने पुढे म्हटले. अटक करण्यात आलेल्या ईडी अधिकाऱ्याला दिलेला अंतरिम जामीन पुढील आदेशापर्यंत वाढवला आहे.

Web Title: Can the state police arrest officers of the Central Investigation Agency?; The Supreme Court said...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.