नवी दिल्ली - कॅप्टन अमरिंदर सिंग (Amarinder Singh) यांनी पंजाबच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्याने काँग्रेस (Congress) अंतर्गत राजकारणात खळबळ उडाली. आता काँग्रेसने ज्याला हवे त्याला मुख्यमंत्री बनवावे, अशी उद्विग्न प्रतिक्रिया अमरिंदर सिंग यांनी राजीनाम्यानंतर दिली. अमरिंदर सिंग यांनी राज्यपालांकडे राजीनामा सोपवल्यानंतर पक्षामध्ये माझा अपमान होत असल्याचे सांगितले. अमरिंदर यांनी राजीनामा दिल्यानंतर पंजाबमधीलराजकारणात आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. याच दरम्यान आता अमरिंदर यांची पत्नी आणि खासदार परनीत कौरसुद्धा (Preneet Kaur) काँग्रेस नेतृत्वावर नाराज असल्याची माहिती समोर येत आहे.
"काँग्रेसला आगामी निवडणुकांमध्ये 15 जागा मिळणंही मुश्कील "असल्याचं म्हणत त्यांनी सणसणीत टोला लगावला आहे. परनीत कौर यांनी "अशीच परिस्थिती राहिल्यास आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये 117 पैकी 15 जागाही पक्षाला जिंकता येणार नाहीत" असं म्हटलं. दैनिक भास्करला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे विधान केलं आहे. पुढील वर्षी पंजाबमध्ये विधानसभेसाठी निवडणुका होणार आहेत. "अमरिंदर सिंग हे एक सैनिक आहेत त्यामुळे या युद्धामध्येही ते नक्कीच विजयी होतील" असं म्हटलं आहे. तसेच कृषी कायद्यांबद्दल परनीत कौर यांनी आंदोलन संपवण्यासंदर्भात अमरिंदर हे भाजपा सरकारमधील वरिष्ठ नेत्यांच्या संपर्कात आहेत आणि लवकरच यासंदर्भातील चांगली बातमी समोर येईल अशी आशा व्यक्त केली आहे.
"अमरिंदर सिंग हे सध्या कृषी कायद्यांसंदर्भात चर्चा करताहेत"
शेतकरी आंदोलन हा आगामी काळामधील विधानसभा निवडणुकींमधील महत्वाचा मुद्दा राहणार असल्याचं मतही त्यांनी व्यक्त केलं आहे. परनीत कौर यांनी दिलेल्या माहितीनुसार, "अमरिंदर सिंग हे सध्या कृषी कायद्यांसंदर्भात चर्चा करत आहेत. सध्या ते पंजाबच्या सुरक्षेसंदर्भातही चिंतेत असल्याचंही त्यांच्या पत्नीने सांगितलं आहे. 1998 साली पंजाबमध्ये काँग्रेसचा तेव्हा काहीच प्रभाव नव्हता त्या काळी आपल्या मेहनतीच्या जोरावर त्यांनी काँग्रेसला राज्यात जनाधार मिळवून दिला. 2002 साली त्यांच्या प्रयत्नांमुळे राज्यात काँग्रेसचं सरकार आलं. 2017 साली पंजाबमध्ये आम आदमी पार्टीचं सरकार येईल असा अंदाज व्यक्त केला जात असतानाही अमरिंदर सिंग यांच्या पाठीशी पंजाबचे लोक उभे राहिले आणि काँग्रेसचा विक्रमी विजय मिळाला."
"मी खासदार असेपर्यंत पतियालामधील लोकांची सेवा करेन"
परनीत कौर यांनी सध्या तरी मी काँग्रेसमध्ये आहे. पुढील गोष्टींबद्दल काँग्रेसच्या नेतृत्वालाच ठावूक असेल असं म्हणत त्यांनी सविस्तर माहिती देणं टाळलं. परनीत कौर यांच्या खासदारकीचा अडीच वर्षाचा कार्यकाळ बाकी आहे. मी खासदार असेपर्यंत पतियालामधील लोकांची सेवा करत राहील. काँग्रेसमधील अंतर्गत वाद वाढत असल्याचं निरिक्षणही परनीत कौर यांनी नोंदवलं. सध्या तरी मला पक्षासाठी चांगलं वातावरण आहे असं वाटतं नाही असं सांगतानाच अमरिंदर सिंग यांच्याशी चर्चा करण्यासाठी कोणत्याही मोठ्या नेत्याचा फोन आला नव्हता. अमरिंदर हे स्वत: निर्णय घेतात हे सर्वांनाच माहीत आहे असंही त्यांनी म्हटलं आहे.