नवी दिल्ली : केंद्र सरकारचे कित्येक लाख कर्मचारी, पेन्शनधारक आणि त्यांच्या कुटुंबियांना सेंट्रल गव्हर्नमेंट हेल्थ स्कीम (सीजीएचएस) अंतर्गत दिली जाणारी कॅशलेस वैद्यकीय उपचारांची सोय बंद करण्याची धमकी डॉक्टरांच्या संघटना, रुग्णालये आणि नर्सिंग होम्सनी दिली आहे.या योजनेअंतर्गत सरकारकडून दिले जाणारे पैसे खूप उशिरा मिळतात आणि त्यांचे दरही कमी आहेत या कारणांमुळे ही सेवा बंद करण्याची धमकी दिली गेली आहे. सीजीएचएस आणि एक्स सर्व्हिसमेन कॉन्ट्रिब्युटोरी हेल्थ स्कीम अंतर्गत किमान एक हजार कोटी रुपये सरकारकडून आलेले नसल्यामुळे ही सेवाच बंद करण्याचा इशारा असोसिएशन आॅफ हेल्थकेअर प्रोव्हायडर्सने (इंडिया) दिला आहे.नाराजी का?संपूर्ण भारतात सीजीएचएसचा लाभ ३.२ दशलक्ष तर ५,५०,००० लाभार्थी ईसीएचएसचे आहेत. एएचपीआयचे महासंचालक डॉ. गिरधर ग्यानी म्हणाले की, सीजीएचएससारख्या योजनांतर्गत रुग्णांना उपचार करणे थांबवू असे आम्हाला म्हणायचे नाही.आमचे म्हणणे एवढेच आहे की, कॅशलेस ट्रीटमेंट थांबवू. सरकारकडून विलंबाने पैसे मिळत असल्यामुळे आम्ही हा तात्पुरता उपाय करीत आहोत, असे ग्यानी म्हणाले.लीलावती, हिंदुजा, अपोलो, मॅक्स, फोर्टिस, गंगा राम, ख्रिश्चन मेडिकल कॉलेज (वेल्लोर) आदी मोठ्या परंतु खासगी रुग्णालयांसह किमान १० हजार एएचपीआयचे सदस्य ३३ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांत आहेत.
केंद्राच्या लाभार्थींची कॅशलेस ट्रीटमेंट बंद?
By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2019 2:19 AM