जात जन्मावरूनच ठरते, लग्नानंतर बदलत नाही! - सर्वोच्च न्यायालय
By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2018 04:33 PM2018-01-20T16:33:49+5:302018-01-20T16:42:46+5:30
महिलेने आंतरजातीय विवाह केला, तर लग्नानंतर तिची जात बदलते आणि पती ज्या जातीचा आहे, तीही त्याच जातीची होते, असा जर तुम्ही विचार करत असाल, तर तो चुकीचा आहे.
नवी दिल्लीः महिलेने आंतरजातीय विवाह केला, तर लग्नानंतर तिची जात बदलते आणि पती ज्या जातीचा आहे, तीही त्याच जातीची होते, असा जर तुम्ही विचार करत असाल, तर तो चुकीचा आहे. कारण, लग्नानंतर महिलेची जात बदलत नाही, असं थेट सर्वोच्च न्यायालयानेच सूचित केलं आहे.
तुम्ही ज्या जातीत जन्माला येता, शेवटपर्यंत त्याच जातीचे राहता, असं स्पष्ट मत खंडपीठाने मांडलं आहे.
बुलंदशहरमधील एक महिला 21 वर्षांपूर्वी मागासवर्गीय कोट्यातून केंद्रीय विद्यालयात शिक्षिका म्हणून रुजू झाली होती. परंतु, तिचा जन्म अग्रवाल कुटुंबात - अर्थात सर्वसाधारण प्रवर्गात झाल्याचं लक्षात घेऊन अलाहाबाद उच्च न्यायालयाने तिची नियुक्ती रद्दबातल ठरवली होती. या निर्णयाला तिनं सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं होत. आपला पती मागासवर्गीय समाजातील असल्यानं लग्नानंतर आपणही त्याच जातीच्या झालो आहोत, असं तिचं म्हणणं होतं. परंतु, न्यायमूर्ती अरुण मिश्रा आणि एम एम शंतनागौदर यांच्या खंडपीठाने तिचा हा दावा खोडून काढला.
जन्माने जी जात तुम्हाला मिळाली आहे, ती अपरिवर्तनीय आहे. लग्नानंतरही त्यात बदल होत नाही, असं खंडपीठाने नमूद केलं. सदर महिला ही अग्रवाल कुटुंबात जन्मली असून ही जात सर्वसाधारण प्रवर्गात मोडते. मात्र, तिचा पती हा मागासवर्गीय समाजातील असल्याने तिला लग्नानंतर मागास प्रवर्गाचे जात प्रमाणपत्र कसे काय मिळू शकते?, असा प्रश्न करत खंडपीठाने तिची याचिका फेटाळली.
दरम्यान, या महिलेला १९९१ मध्ये बुलंदशहर जिल्हा दंडाधिकाऱ्यांमार्फत जात प्रमाणपत्र मंजूर करण्यात आले होते. त्यानंतर शैक्षणिक पात्रता आणि जात प्रमाणपत्र याच्या आधारे या महिलेला मागासवर्गीयांच्या कोट्यातून १९९३मध्ये पंजाबमधील पठाणकोट येथील केंद्रीय विद्यालयात नोकरी मिळाली होती. या शाळेत शिक्षिका म्हणून काम करताना या महिलेने आपले 'एम.एड'ही पूर्ण केले. मात्र, तिने बेकायदेशीरपणे आरक्षणाचा फायदा घेतल्याचं समोर आल्यानंतर 2015 मध्ये तिचं जात प्रमाणपत्र रद्द केलं होतं आणि केंद्रीय विद्यालयाने तिची नियुक्तीही रद्द केली होती.