भारतात सातत्याने येणाऱ्या वादळ, पूर आणि ढगफुटीसारख्या घटनांचे कारण आले समोर, जाणकार सांगतात...
By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2021 05:21 PM2021-08-09T17:21:01+5:302021-08-09T17:26:00+5:30
Climate Change: आधी वाटायचं की, हवामान बदलाचा परिणाम आपल्याला 50 ते 90 वर्षानंतर दिसेल. पण, आता हा 10-30 वर्षातच दिसण्याची शक्यता आहे.
नवी दिल्ली: मागच्या काही काळात भारतीय उपखंडातील संपूर्ण परिसर म्हणजेच भारत, बांगलादेश ते नेपाळ, दक्षिण चीन आणि अफगाणिस्तानपर्यंतचे क्षेत्र सातत्याने वादळ, पूर आणि ढगफुटींसारख्या आपत्तींना तोंड देत आहे. येत्या काळात अशा घटनांमध्ये तीव्रतेने वाढ होणार असल्याची माहिती ग्लेशियोलॉजिस्ट पॉल मायेव्स्की यांनी दिली आहे.
पॉल यांनी सांगितल्यानुसार, आर्कटिक, अंटार्कटिक आणि एव्हरेस्टचा बर्फ वितळत असल्यामुळे अशा घटना वाढल्या आहेत. पॉल जगातील एकमेव ग्लेशियोलॉजिस्ट आहेत, ज्यांनी तिन्ही क्षेत्रांच्या वातावरण बदलाचा अभ्यास केला आहे. ते जगातील सर्वात जुन्या क्लायमेट चेंज इंस्टीट्यूट, यूनिव्हर्सिटी ऑफ मेनच संचालकदेखील आहेत. दैनिक भास्करला त्यांनी दिलेल्या मुलाखतीत त्यांनी बरीच माहिती दिली आहे.
भारतीय उपखंडात पूर-दुष्काळ वाढण्याचे कारण ?
भारतात दक्षिण आणि पश्चिम भागात आर्द्रतेचे प्रमाण जास्त आहेत. परंतु काही वर्षांपासून आर्क्टिक ध्रुवावरुनही भारतामध्ये ओलावा पोहोचत आहे. याचे कारण म्हणजे आर्क्टिक, अंटार्क्टिक आणि हिमालयातील हिमनद्या हवामान बदलामुळे सर्वाधिक प्रभावित होत आहेत. जगातील तापमान वाढ 1.5 अंश असताना, या क्षेत्रांमधील तापमानवाढ 4 अंशांपर्यंत गेली आहे. दरम्यान, बर्फ वेगाने वितळत असल्यामुळे त्याच्या ओलाव्यासह वारे हिमालयाच्या उत्तर आणि दक्षिण दिशेने वेगाने वाहत आहेत.
जेव्हा हे थंड वारे सखल भागातील उबदार वाऱ्यांसोबत मिसळतात, तेव्हा वादळ तयार होते. त्यामुळेच भारतात मागील अनेक दिवसांपासून वादळी पाऊस आणि पूर येण्याच्या घटना वाढल्या आहेत. हा बर्फ वितळण्यासह, जंगल कमी झाल्यमुळे पाऊस जमीनीत मुरण्याऐवजी मातीला घेऊन नद्यांसोबत मिसळत आहे. त्यामुळेच एखाद्या ठिकाणी थोडा पाऊस झाला तरी पूर परिस्थिती तयार होत आहे आणि पाऊस थांबताच नद्यांमधील प्रवाह पूर्णपणे थांबून नदी कोरडी पडतीये.
परिस्थिती किती वेगाने बदलतीये ?
90 च्या दशकात आपल्याला वाटायचं की, हवामान बदलाचा परिणाम आपल्याला 50 ते 90 वर्षानंतर दिसेल. पण, आता हा 10-30 वर्षातच दिसण्याची शक्यता आहे. तुम्हीही वृत्तपत्रात वाचत असाल किंवा टीव्हीवर पाहत असाल, मागच्या काही दिवसात ढगफुटीच्या घटना चांगल्याच वाढल्या आहेत. ढगफुटी होणे म्हणजे वातावरणातील आद्रता वाढून प्रचंड पाऊस पडणे. जगातील तापमान वाढीमुळे अनेक ठिकाणी या घटना घडत आहेत. यामळे मोठ्या आर्थिक नुकसानीसह जीवितहानी देखील होत आहे.
दैनंदिन जीवनावर काय परिणाम होणार ?
बर्फाळ प्रदेशातील बर्फ एखाद्या स्पंजप्रमाणे प्रदूषण शोषून घेत असतो. पण, बर्फ वितळत असल्यामुळे प्रदुषण वाढत आहे. याशिवाय, बर्फ वितळल्यामुळे यातील जमा असलेले दुषित प्रदुषण नद्यांमध्ये जमा होऊन नद्यांनाही दुषित करतोय. याचा आपल्यावरही परिणाम होतोय. तसचे, आजकाल बर्फाचा रंगही राखाडी होऊ लागला आहे. त्यामुळे वातावरणातील उष्णता नष्ट करण्याऐवजी आता बर्फातच बरीच उष्णता साचून राहतीये.
हवामान बदलाचे सर्वात वाईट स्वरूप कोणते असेल?
जगातील लाखो टन मिथेन वायू बर्फाखाली जमा आहे. जर पर्माफ्रॉस्ट नावाचा बर्फाचा थर वितळवून मिथेन वातावरणात आला तर ते वातावरणाची उष्णता 30 ते 50 पट वाढवू शकतो. वाढत्या उष्णतेमुळे जगातील बर्फाचे आवरण वितळून समुद्राची पातळी 70 मीटरपर्यंत वाढू शकते. यामुळे समुद्राजवळ राहणाऱ्यांना पाण्याचा आणि जे समुद्राच्या जवळ राहत नाहीत त्यांना तीव्र दुष्काळ, जंगलातील आग आणि धुळीच्या वादळांना सामोरे जावे लागेल.