जीन्स, टी-शर्ट, स्पोर्ट्स शूज चालणार नाहीत!; CBI अधिकाऱ्यांसाठी नव्या संचालकांनी आणली नवी नियमावली
By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2021 02:53 PM2021-06-04T14:53:35+5:302021-06-04T14:55:20+5:30
केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) अधिकाऱ्यांना आता ड्युटीवर येताना जीन्स, टी-शर्ट आणि स्पोटर्स शूज घालता येणार नाहीत.
केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) अधिकाऱ्यांना आता ड्युटीवर येताना जीन्स, टी-शर्ट आणि स्पोटर्स शूज घालता येणार नाहीत. सीबीआयचे नवनिर्वाचित संचालक सुबोधकुमार जयस्वाल यांनी विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या गणवेशाच्या नियमावलीत महत्वाचे बदल केले आहेत. सीबीआयमध्ये कार्यरत असलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी ड्युटवर येताना फॉर्मल कपडे परिधान करावेत, आता कार्यालयात जीन्स, टी-शर्ट आणि स्पोर्ट्स शूज चालणार नाहीत, असे आदेश सुबोधकुमार जयस्वाल यांनी दिले आहेत.
सुबोधकुमार जयस्वाल यांनी मंजुरी दिलेलं एक परिपत्रक सहाय्यक संचालक(प्रशासन विभाग) अनूप टी मॅथ्यू यांनी जारी केलं आहे. सीबीआयच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना आता जीन्स, टी-शर्ट, स्पोर्ट्स शूज किंवा चप्पल घालून कार्यालयात येता येणार नाही, असं स्पष्ट केलं आहे. सीबीआयमधील पुरूष अधिकाऱ्यांना फॉर्मल शर्ट-पँट आणि फॉर्मल शूज घालणं बंधनकारक असणार आहे. त्यासोबतच अधिकाऱ्यांना दाढी देखील वाढवता येणार नाही. तर महिला अधिकारी आणि कमचाऱ्यांना ड्युटीवर येताना केवळ साडी किंवा फॉर्मल शर्ट परिधान करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
सुबोधकुमार आणखी काही बदल करण्याच्या तयारीत
१९८५ सालच्या बॅचचे आयपीएस अधिकारी असलेल्या सुबोधकुमार जयस्वाल यांनी सीबीआयचे 33 वे संचालक म्हणून पदभार हाती घेतला आहे. त्यांना दोन वर्षांसाठी सीबीआयच्या संचालकपदी नियुक्त करण्यात आलं आहे. ऋषी कुमार शुक्ला यांचा कार्यकाळ ३ फेब्रुवारी रोजी संपुष्टात आल्यानंतर सुबोधकुमार यांना सीबीआयचं संचालक करण्यात आलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या तीन सदस्यीय निवड समितीनं सुबोधकुमार जयस्वाल यांच्या नावाला मंजुरी दिली होती. आगामी काळात सीबीआयमध्ये आणखी काही महत्वपूर्ण बदल करण्याचा सुबोधकुमार यांचा मानस असल्याचं सांगितलं जात हे.