पश्चिम बंगालमध्ये अभिषेक बॅनर्जींच्या निकटवर्तीयाच्या घरावर सीबीआयचा छापा
By बाळकृष्ण परब | Published: December 31, 2020 03:00 PM2020-12-31T15:00:06+5:302020-12-31T15:01:50+5:30
West Bengal News : पश्चिम बंगालमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यातील राजकीय हालचाली वाढू लागल्या आहेत.
कोलकाता - पश्चिम बंगालमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यातील राजकीय हालचाली वाढू लागल्या आहेत. दरम्यान, आज सीबीआयने कोलकातामधील तृणमूल यूथ काँग्रेसचे सचिव विनय मिश्रा यांच्या घरावर छापा घातला. पशू तस्करी घोटाळ्यावरून हा छापा टाकण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार सीबीआयकडून विनय मिश्रा यांना वारंवार नोटिसा पाठवण्यात आल्या होत्या. मात्र त्यांनी त्या नोटिसांकडे वारंवार दुर्लक्ष केले होते. विनय मिश्रा यांना तृणमूल काँग्रेसचे नेते अभिषेक बॅनर्जी यांचे निकटवर्तीय मानले जाते. अभिषेक बॅनर्जी हे बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे भाचे आहेत.
गुरुवारी सीबीआयची टीम कोलकाता येथील विनय मिश्रा यांच्या ठिकाणांवर पोहोचली. दोन ठिकाणी पशूधन घोटाळा आणि एका ठिकाणी कोळसा चोरी प्रकरणी छापे टाकण्यात आले. प्राथमिक माहितीनुसार कोलकातामध्ये विनय मिश्रा यांच्या अन्य ठिकाणांवर छापेमारी करण्यात येऊ शकते.
याशिवाय आसनसोलमधील विख्यात कोळसा तस्करी कांड प्रकरणी हुगळी जिल्ह्याचे नाव जोडले गेले आहे. सीबीआयच्या पथकाने गुरुवारी जिल्ह्यातील कोननगरमध्ये अमित सिंह आणि नीरज सिंह या दोन भावांच्या ठिकाणांवर छापा मारला. मात्र सीबीआयच्या छाप्यावेळी सिंह बंधू बेपत्ता होते. सीबीआयने त्यांच्या कुटुंबीयांकडून माहिती घेतली. सीबीआय टीमच्या सोबत केंद्रीय सुरक्षा दलांचे जवान उपस्थित होते.