India China Tension On Border : भारत आणि चीनदरम्यान तणावाची स्थिती अद्यापही कायम आहे. यादरम्यान चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपिन रावत यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. "लाईन ऑफ अॅक्च्युअल कंट्रोलवर गलवान खोऱ्यात आणि अन्य ठिकाणी झालेल्या झटापटीनंतर चिनी सैन्याला त्यांना अजून तयारीची आणि चांगल्या प्रशिक्षणाची गरज असल्याचं जाणवलं," असं मोठं वक्तव्य रावत यांनी केला.
"चिनी सैनिक हिमालयाच्या टेकड्यांवर लढाईसाठी सक्षम नाहीत आणि ते दीर्घ कालावधीसाठी सामनाही करू शकत नाहीत," असं रावत म्हणाले. त्यांनी इंडिया टुडेशी विशेष संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते. "भारताला लागून असलेल्या सीमेवर चीनच्या सैनिकांनी तैनातीमध्ये बदल केला आहे. ज्या प्रकारे गलवान आणि अन्य ठिकाणी त्यांचा सामना भारतीय लष्कराशी झाला, त्यावरून त्यांना आणखी प्रशिक्षणाची गरज असल्याचं जाणवलं आहे," असं त्यांनी नमूद केलं.
"चिनी सैनिक हे छोटी लढाई लढू शकतात. त्यांच्याकडे या भागात लढाईचा अनुभव नाही. भारत चीनच्या हालचालींवर नजर ठेवून आहे. भारतीय लष्कर सदैव सज्ज आहे," असं रावत यांनी गलवान खोऱ्या झालेल्या झटापटीदरम्यान चिनी सैन्याला झालेल्या नुकसानीबद्दल बोलताना सांगितलं. भारतीय लष्कराच्या जवानांनी उत्तम तयारी केली आहे. डोंगराळ भागांमध्ये आपलं लष्कर हे चिनी लष्कराच्या तुलनेत उत्तमच आहे. लष्करासाठी वेस्ट आणि नॉर्थ फ्रन्ट दोन्ही आवश्यक आहे. नॉर्दन फ्रन्टमध्ये सध्या काही हालचाली वाढल्या असल्याचंही रावत यांनी नमूद केलं.