श्रीनगर : पाकिस्ताननं शस्त्रसंधीचं उल्लंघन करत पुरा सेक्टरमध्ये गोळीबार केला आहे. यामध्ये सीमा सुरक्षा दलाचा एक जवान शहीद झाला आहे. पाकिस्तानच्या गोळीबाराला भारतीय सैन्यानं चोख प्रत्युत्तर दिलं आहे. पाकिस्तानी सैन्याकडून करण्यात आलेल्या गोळीबारात दोन नागरिक जखमी झाले आहेत. विशेष म्हणजे मोदी सरकारनं रमजानच्या महिन्यात एकतर्फी शस्त्रसंधी जाहीर केली असताना, पाकिस्तानच्या कुरापती सुरू आहेत. गुरुवारी रात्री उशिरा बांदीपुरामधील हाजिन सेक्टर 13 मध्ये गस्त घालणाऱ्या राष्ट्रीय रायफल्सच्या एका पथकावर दहशतवाद्यांनी हल्ला केला. यानंतर सतर्क झालेल्या जवानांनी रात्रभर सर्च ऑपरेशन राबवलं. मात्र अद्याप जवानांना एकही दहशतवादी सापडलेला नाही. शांतता राखण्याच्या प्रयत्नांचा भाग म्हणून मोदी सरकारनं रमजानच्या महिन्यात एकतर्फी शस्त्रसंधी जाहीर केली आहे. मात्र रमजानच्या पहिल्याच दिवशी जम्मू-काश्मीरच्या सांबा आणि कठुआ जिल्ह्यांमध्ये बुधवारी रात्रभर पाकिस्तानकडून गोळीबार सुरू होता. भारतीय सैन्याच्या 15 चौक्या आणि काही वसाहतींना पाकिस्तानी सैन्यानं लक्ष्य केलं. पाकिस्तानी सैन्यानं उखळी तोफांचाही मारा केला. यामध्ये सीमा सुरक्षा दलाचा एक जवान जखमी झाला. याआधी सांबा सेक्टरमध्ये 15 मे रोजी पाकिस्तानी सैन्यानं शस्त्रसंधीचं उल्लंघन करुन भारतीय लष्कराच्या चौक्यांवर गोळीबार केला होता. सीमेपलीकडून घुसखोरी करु पाहणाऱ्या दहशतवाद्यांना मदत करण्यासाठी हा गोळीबार करण्यात आला होता. यावेळी पाकिस्तानी सैन्याच्या गोळीबाराला प्रत्युत्तर देताना सीमा सुरक्षा दलाचा एक जवान शहीद झाला. रविवारपासून पाकिस्तानकडून चारवेळा घुसखोरीचे प्रयत्न झाले आहेत. हे सर्व प्रयत्न भारतीय लष्करानं हाणून पाडले आहेत.
मोदी सरकार तोंडघशी! एकतर्फी शस्त्रसंधीनंतरही पाकिस्तानच्या कुरापती सुरूच; एक जवान शहीद
By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2018 8:25 AM