नवी दिल्ली : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशनतर्फे (सीबीएसई) घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा आज निकाल जाहीर झाला. देशभरातून यावर्षी एकूण 16 लाख 24 हजार 682 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी 14 लाख 8 हजार 594 विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
यंदा सीबीएसई दहावीचा एकूण निकाल 86.70 टक्के लागला आहे. या परीक्षेत प्रखर मित्तल, रिमझिम अग्रवाल, नंदिनी गर्ग आणि श्रीलक्ष्मी या विद्यार्थ्यांनी 500 पैकी 499 गुण मिळवत अव्वल स्थान पटकावले आहे. देशभरात 88.67 % मुली उत्तीर्ण झाल्या आहेत तर 85.32 टक्के मुलं देशात उत्तीर्ण झाली आहेत. म्हणजेच यंदा या परीक्षेत मुलींनीच बाजी मारली आहे.
विभागनुसार, तिरुवनंतपूरममध्ये सर्वाधिक 99.60 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्याखालोखाल चेन्नई विभागाने 97.37 टक्के आणि अजमेर विभागाने 91.86 टक्के अशी बाजी मारली आहे.
यंदाच्या वर्षी एकूण 16 लाख 24 हजार 682 विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली होती. सीबीएसईच्या 2018च्या (दहावी आणि बारावीच्या संयुक्त) परीक्षेला जगभरातून 28 लाख विद्यार्थी बसले होते. सीबीएसई दहावीचा निकाल cbseresults.nic.in आणि cbse.nic.in या वेबसाइटवर पाहायला मिळणार आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वी केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळा(CBSE )चे दहावी आणि बारावीचे पेपर फुटले होते. त्यामुळे त्या पेपर फुटलेल्या विषयांच्या फेरपरीक्षा घेण्यात आल्या होत्या. त्याच वेळी दिल्ली व हरियाणा वगळता इतर राज्यातील दहावीच्या मुलांना दिलासा देण्यात आला होता. बारावीच्या अर्थशास्त्राच्या पेपरची 25 एप्रिलला पुनर्परीक्षा घेण्यात आली होती. परंतु दहावीच्या गणिताच्या पेपरची फक्त हरियाणा आणि दिल्लीतच फेरपरीक्षा झाली होती.